झाकीर हुसेन रुग्णालयात गलथान कारभाराचा कळस
By Admin | Published: September 23, 2016 01:23 AM2016-09-23T01:23:46+5:302016-09-23T01:24:08+5:30
दुर्लक्ष : रुग्णांवर गांभीर्याने उपचार होत नसल्याची तक्रार
नाशिक : जुने नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वैद्यकीय व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णांना बसत आहे. डेंग्यूसदृश आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना थेट खासगी किंवा जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
झाकीर हुसेन रुग्णालय नेहमीच सोयीसुविधा व अन्य बाबींमुळे चर्चेत राहिले आहे. या रुग्णालयाकडे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन ढिसाळ झाले असून, वैद्यकीय चमूकडूनदेखील फारसे गांभीर्याने रुग्णांवर उपचार केले जात नसल्याचे बोलले जात आहे. जुने नाशिक परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले असून, रुग्णांना प्रथमोपचारासाठी नागरिक झाकीर हुसेन रुग्णालयात घेऊन जातात; मात्र या ठिकाणी रुग्ण दाखल झाल्यानंतर तात्पुरते उपचार केले जातात व रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी खालावते आणि त्यानंतर रुग्णाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाची वाट दाखविली जात असल्याचे जुने नाशिक भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. मागील चार ते पाच दिवसांमध्ये बहुतांश रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला झाकीर हुसेन रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिल्याचे नागरिक सांगतात. गेल्या शनिवारपासून झाकीर हुसेन रुग्णालयात जोगवाडामधील रय्यान अलीम शेख (२२) हा रुग्ण उपचारार्थ दाखल होता. या रुग्णाच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या आणि तांबड्या पेशींमध्ये वाढ झाल्याने प्रकृती खालावली होती. सदर रुग्णाचा चाचणी अहवाल डेंग्यूसदृश आला आहे. प्रकृती बिघडत असल्याने हुसेन रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचे नागरिकांनी सांगितले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील आरोपांचे खंडन केले आहे. नागरिकांनी गैरसमज करून घेत तक्रारी केल्याचे भंडारी यांनी सांगितले. याबाबत वैयक्तिक लक्ष घालून रुग्णांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिल्याचे ते
म्हणाले. (प्रतिनिधी)