भरवशाच्या व्यक्तीकडूनच जरीफ चिश्ती बाबांचा विश्वास‘घात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 01:50 AM2022-07-15T01:50:52+5:302022-07-15T01:51:10+5:30

मूळ अफगाणिस्तानी नागरिक असलेले मुस्लीम धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, हल्ली मुक्काम मिरगाव, सिन्नर) यांचा पंधरवड्यापूर्वी नाशिकच्या येवल्याच्या औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत चौघा संशयितांना बदलापूरमधून बेड्या ठोकल्या. बाबांची पत्नी गरोदर असल्याने बाळाच्या जन्मानंतर त्यांच्याकडून संपत्तीचा वारस त्या बाळाला केली जाण्याची भीती संशयितांना वाटल्यामुळे बाबांचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Zarif Chishti Baba's trust was 'betrayed' by a trusted person. | भरवशाच्या व्यक्तीकडूनच जरीफ चिश्ती बाबांचा विश्वास‘घात’

भरवशाच्या व्यक्तीकडूनच जरीफ चिश्ती बाबांचा विश्वास‘घात’

Next
ठळक मुद्देचौघांना ठोकल्या बेड्या : संपत्तीला वारसाचे नाव लावण्याच्या भीतीपोटी खून केल्याचा संशय

नाशिक : मूळ अफगाणिस्तानी नागरिक असलेले मुस्लीम धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, हल्ली मुक्काम मिरगाव, सिन्नर) यांचा पंधरवड्यापूर्वी नाशिकच्या येवल्याच्या औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत चौघा संशयितांना बदलापूरमधून बेड्या ठोकल्या. बाबांची पत्नी गरोदर असल्याने बाळाच्या जन्मानंतर त्यांच्याकडून संपत्तीचा वारस त्या बाळाला केली जाण्याची भीती संशयितांना वाटल्यामुळे बाबांचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

जरीफ चिश्ती बाबा हे अफगाणी निर्वासित नागरिक म्हणून भारतात वास्तव्यास होते. ते मागील दोन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मीरगाव शिवारातील बंगल्यात भाडेतत्त्वावर राहत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जरीफबाबा हे प्रसिद्ध झाले होते. यू ट्यूबवर जरीफबाबांनी सोशल मीडियाद्वारे मोठा चाहता वर्ग जोडला होता. तत्त्वज्ञान, अध्यात्माच्या गाेष्टी व सुफी विचारधारेबाबत ते विविध प्रकारचे व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब, फेसबुक, ट्वीटवर पोस्ट करत होते. त्यास लाखोंच्या संख्येने पसंती मिळत होती. त्यामुळे यू-ट्यूबकडून त्यांना रक्कम दिली जात होती. तसेच काही देणगीही त्यांना मिळत होती. या माध्यमातून त्यांनी दोन ते तीन कोटी रुपयांची मालमत्ता भारतात जमविली होती. निर्वासित असल्याने त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार हे जवळचे विश्वासू सेवेकरी गफार अहमद खान या स्थानिक सेवेकऱ्याच्या नावावर केले आहेत. या सेवेकऱ्याने बाबांच्या जुना कारचालकाशी संगनमत करून मालमत्तेच्या हव्यासापोटी खुनाचा कट रचला व तो तडीस नेला, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या फरार दोघा साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यास यश येईल, असे पाटील म्हणाले.

--इन्फो---

...या चौघांनी काढला बाबांचा काटा

बाबांचा जवळचा विश्वासू सेवेकरी गफार अहमद खान याच्या नावावर त्यांनी घेतलेली जमीन, कार व रोखीचे व्यवहार आपल्या नावावर करुन घेण्याचा बेत संगनमताने संशयित आरोपी गणेश ऊर्फ देवा बाबासाहेब झिंजाड-पाटील (२८, रा. लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर), बाबाचा कारचालक रवींद्र चांगदेव तोरे (२५, रा. काेळपेवाडी, ता. कोपरगाव), पवन पोपट आहेर (२६, रा. विठ्ठलनगर, येवला, नाशिक) आणि गफार खान यांनी आखला होता. यानंतर चौघांनी मिळून येवल्यातील आणखी दोघा साथीदारांना हाताशी धरून बाबांचा काटा काढला.

 

---इन्फो--

गोळीबार करणारा ‘शूटर’ फरार

जरीफ चिश्ती बाबांचा कट रचणारे चौघे संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले; मात्र बाबा कारमध्ये बसत असताना अगदी काही फुटांवरून त्यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडणारा ‘शूटर’ अद्याप फरार आहे. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहेत. या शूटरने बाबांच्या डोक्यात अगदी जवळून एक गोळी घातली. त्यामुळे बाबांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

---इन्फो---

‘ॲम्बेसी’ला सोपविणार मृतदेह

मुसळधार पाऊस व अन्य काही अपरिहार्य कारणांस्तव जरीफ चिश्ती बाबांच्या वडिलांसह नातेवाईक भारतात येऊ शकत नसल्याचे अफगाणिस्तानच्या दूतावास कार्यालयाने ग्रामीण पोलिसांना माहिती कळविली आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाशिक ग्रामीण पोलीस बाबांचा मृतदेह मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाला पाठविणार आहेत. तेथे प्रक्रिया केल्यानंतर मृतदेह मुंबईस्थित अफगाणिस्तान वाणिज्य दूतावास कार्यालयाकडे सोपविला जाणार असून, तेथून पुढे अफगाणिस्तानात मृतदेह रवाना करण्याची जबाबदारी दूतावास कार्यालय पार पाडणार असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

---

 

 

Web Title: Zarif Chishti Baba's trust was 'betrayed' by a trusted person.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.