पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषद संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:42 AM2018-11-21T01:42:08+5:302018-11-21T01:42:22+5:30
शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.
नाशिक : शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.
पाणीटंचाईबाबत मंगळवारी येवला येथे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रांताधिकारी दराडे, तहसीलदार वारोळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी शीतल सांगळे यांनी पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी करून याबाबतचे सर्व गावांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला तालुक्यातील पाणीटंचाईबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. गिते यांनी विंधन विहिरींचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे तसेच याकामी हलगर्जीपणा केल्यास ग्रामसेवकास जबाबदार धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ३८ गाव पाणीपुरवठा योजना, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, चाराटंचाई आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या २१ टँकर सुरू असून, त्याद्वारे ३६ गाव व २६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखीही टँकर लागणार असतील तर त्याचे प्रस्ताव तयार ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
अंदरसूल येथील पाणीपुरवठा योजनेबाबत मार्गदर्शन करताना डॉ.गिते यांनी या योजनेच्या पाइपलाइनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस पंचायत समिती सभापती नम्रता जगताप, उपसभापती रूपचंद भागवत, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, पंचायत समिती सदस्य कांतीलाल साळवे, भूजल विकास यंत्रणेचे बेडवाल, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.