राजकीय पक्षांनी कसली कंबर! निवडणुकांचा मांडला डाव; मतदारांच्या मनाचा लागेना ठाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:50 PM2022-03-09T12:50:58+5:302022-03-09T12:58:29+5:30
पेठ - आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पेठ तालुक्यातील कोहोर गटातून सर्वच राजकीय पक्षांनी ...
पेठ - आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पेठ तालुक्यातील कोहोर गटातून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असली तरी मतदारांच्या मनात नेमकं काय आहे याचा ठाव मात्र कोणालाच घेता येऊ शकत नाही.
कोहोर गट तसा निवडणुकांमध्ये चमत्कार घडवून आणणारा गट आहे. यापूर्वीच्या निवडणुकांवर प्रकाशझोत टाकताना याच गटातून कॉंग्रेसचे कोंडाजी मामा आव्हाड यांच्या पत्नी निवडून आल्या होत्या. त्यानंतर मात्र याच गटातून प्रमोद मोरे यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापन झालेल्या मनसेचे सुधाकर राऊत यांना मतदारांनी पसंती देत जिल्हा परिषद सदस्य बनवले. नंतरच्या काळात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेचे भास्कर गावित यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले. सध्या शिवसेनेच्या हेमलता गावित या कोहोर गटाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कोहोर गटात करंजाळी व कोहोर असे दोन गण असून दोन्ही गणांवर शिवसेनेची सत्ता आहे. आगामी काळात गट व गणांच्या पुनर्रचनेबाबत तालुक्यात संभ्रमवस्था असून त्याचाही अंदाज सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे मातब्बर इच्छुक रिंगणात राहतील, असे दिसून येते. यामध्ये आजी-माजी आमदार पुत्रासह आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पक्षांचे तालुका प्रमुख एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेकडून भास्कर गावित पुन्हा एकदा कोहोर गटाची निवडणूक लढवतात का? त्यांचे पुत्र शामराव गावित किंवा करंजाळीचे नंदू गवळी यांना संधी देतात, यावर शिवसेनेच्या गोटात खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी कोहार गटात संपर्क वाढवला आहे. नरहरी झिरवाळ यांचेसह गोकूळ झिरवाळ यांची करंजाळी सासूरवाडी असल्याने तसेच गोकूळ झिरवाळ यांनी कोहोर गटावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याने त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.