जिल्हा परिषद : निपटारा सुरू; महत्त्वाच्या विभागांच्या फाइल्सवर तत्काळ तोडगा फाइल्स ‘बोलू लागल्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:22 AM2018-02-09T01:22:57+5:302018-02-09T01:23:42+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेतील फाइल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाइल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाºया मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाइल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेतील फाइल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाइल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाºया मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाइल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्याकडे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार असून, त्यांनी फाइल्स निपटाºयाला प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते रजेवर गेले असले तरी कामकाजाला कोणताही ब्रेक लागला नसल्याचा दावा लांडगे यांनी केला आहे. अधिकारी आणि खातेप्रमुखांकडून मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या टेबलावर आणलेल्या फाइल्स या बेकायदेशीर तसेच यापूर्वीच्या अधिकाºयांनी नाकारलेल्या असून, अशा फाइल्सवर कोणत्याही प्रकारे स्वाक्षरी न करण्याची भूमिका मीणा यांनी घेतली होती. त्यांच्या काळात जवळपास सर्वच विभागांच्या फाइल्स पडून होत्या. ‘टॉक’ म्हणजे चर्चा करा असा शेरा मीणा हे मारत असले तरी प्रत्यक्षात ते कुणाशीही चर्चा करीत नसल्याने फाइल्सचा कोणताही निर्णय होत नव्हता. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीदेखील फाइल्स निपटारा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही फाइल्सचा प्रवास थांबलेला होता. ‘टॉक’ म्हणून बंदिस्त झालेल्या किंवा एका कोपºयात पडलेल्या फाइल्स आता ‘बोलू लागल्या’ आहेत. या फाइल्सवर निर्णय घेऊन तोडगा काढला जात आहे. दरम्यानच्या काळात मीणा यांची बदली होऊन त्यांच्या जागी नवे मुख्य कार्यकरी अधिकारी म्हणून नरेश गिते यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र आपल्या खासगी कामानिमित्ताने येत्या २२ तारखेपर्यंत रजेवर गेल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अनिल लांडगे हे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहात आहेत. त्यांनी फाइल्स निपटारा करण्याच्या कामाला प्राधान्य दिले असून, आत्तापर्यत ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, तसेच स्वच्छता विभागाच्या फाइल्सचा निपटारा करण्यात आला आहे.
लांडगे यांनी संबंधित विभागात जाऊन फाइल्सवर तातडीने निर्णय घेऊन कामे मार्गी लावली आहेत, तर आता शिक्षण विभागाच्या फाइल्सची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. महत्त्वाच्या विभागांच्या खात्यांच्या फाइल्स पडू न देता त्यावर तत्काळ निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावला जात आहे. फाइल्सची कामे थांबली नाही तर आता वेगाने सुरू असल्याचे लांडगे यांनी सांगितले.