जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:50 AM2019-11-19T01:50:09+5:302019-11-19T01:50:44+5:30
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पंधरा जिल्हा परिषदांच्या व तेरा पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे दोन गट व दोन पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे.
नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पंधरा जिल्हा परिषदांच्या व तेरा पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे दोन गट व दोन पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीबरोबरच त्या त्या गट व गणांत सोमवारपासून निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली असून, १२ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेतील कळवण तालुक्यातील मानूर व दिंडोरीतील खेडगाव या दोन गटांची जागा रिक्त असून, मानूर गटातून विद्यमान खासदार डॉ. भारती पवार या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या, तर खेडगावमधून निवडून आलेले माजी आमदार धनराज महाले यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. निफाड तालुक्यातील नांदुर्डी व नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी या पंचायत समितीतील दोन गणांतील सदस्यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तेव्हापासून ही पदे रिक्त आहेत. (पान ९ वर)
राज्यातही अन्य जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पदे विविध कारणांस्तव रिक्त असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच या मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच, राजकीय हालचालींना वेग आला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड तोंडावर आलेली असताना त्यातच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांची धावपळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे.
१३ डिसेंबरला होणार मतमोजणी
सोमवारी सायंकाळपासूनच निवडणुकीची आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. त्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी, तर ४ डिसेंबरला अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. १२ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.