नाशिकमध्ये दीड लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 01:36 AM2022-06-04T01:36:39+5:302022-06-04T01:37:44+5:30
सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे (४३, रा. अशोका मार्ग) यांनी ४ टक्के म्हणजेच १ लाख ९० हजार रुपयांची मागणी केली होती.
नाशिक: माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे (४३, रा. अशोका मार्ग) यांनी ४ टक्के म्हणजेच १ लाख ९० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ही रक्कम ३ टक्के म्हणजे १ लाख ५० हजार ठरली. ही लाचेची रक्कम, कार्यालयात घेतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याना रंगेहात पकडले.
जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांनी शिक्षकांच्या नियमित वेतनाच्या मान्यतेसाठी आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. यानंतर आता पुन्हा नाशिक जिल्हा परिषदेत लाच घेतानाच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून, दोन्ही घटनांमध्ये लाचेची रक्कम ही लाखांमध्ये आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.