जिल्हा परिषद सदस्यास अटक : चौंधाणे-जोरण रस्त्यावरील घटना भरधाव वाहनाने शिक्षकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:48 PM2017-11-12T23:48:00+5:302017-11-13T00:11:51+5:30
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटाचे जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे चिरंजीव गणेश यांच्या भरधाव मोटारीने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत शिक्षक जागीच ठार झाला.
सटाणा/जोरण : बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटाचे जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे चिरंजीव गणेश यांच्या भरधाव मोटारीने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत शिक्षक जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चौंधाणे-जोरण रस्त्यावर घडली. दरम्यान, अहिरे मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर सटाणा पोलिसांनी अहिरे यांना अटक करून गुन्हा दाखल केला.
जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वत:च्या ब्रीझा मोटार कारने (क्र. एमएच १२ एनपी ६४५०) पठावेकडून जोरणमार्गे सटाण्याकडे येत होते. भरधाव वेगाने मोटारकार जात असताना चौंधाणे-जोरण रस्त्यावरील चिंचपाटीनजीक शिक्षक समाधान वसंत वाघ (२७), रा. निकवेल हे आपल्या शेतातून जोरण रस्त्याकडे येत असताना अहिरे यांच्या मोटारकारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले. वाघ यांना जखमी अवस्थेत उचलून अहिरे यांनी स्वत: उपचारार्थ ग्रामीण रु ग्णालयात भरती केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला. वाघ यांच्या अपघाती निधनाची वार्ता पसरताच निकवेल येथील ग्रामस्थांची येथील ग्रामीण रुग्णालय आवारात गर्दी उसळली होती. यावेळी संतप्त नातेवाइकांनी वाघ यांच्या मृत्यूला जिल्हा परिषद सदस्य अहिरे यांना जबाबदार धरले. अहिरे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यामुळेच ही दुर्घटना घडली असून, त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन नातेवाइकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अहिरे यांना अटक करण्यात आली. रात्री उशिरा अहिरे यांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.