जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्रीपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:51+5:302021-07-08T04:11:51+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सलग दोन निवडणुकीत विजय संपादन करून सात वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल्यानंतर, थेट ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सलग दोन निवडणुकीत विजय संपादन करून सात वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल्यानंतर, थेट लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. भारती पवार यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. लोकसभा निवडणुकीचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना दोन वर्षांपूर्वी दिंडोरी मतदार संघातून पवार या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर मतदारांना सामोऱ्या गेल्या व निवडूनही आल्या. सात वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य व दोन वर्षे खासदार म्हणून काम केल्यानंतर चक्क केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागावी, यातच त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे.
राज्याचे माजी मंत्री व तब्बल आठ वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले ए. टी. पवार यांच्या स्नुषा असलेल्या डॉ. भारती पवार यांना घरातून राजकीय वारसा मिळालेला असला तरी, तालुक्याच्या राजकारणाची कार्यकक्षा ओलांडून पहिल्याच निवडणुकीत नवख्या असलेल्या पवार यांनी सन २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देवळा तालुक्यातील उमराणे गटातून राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर बाजी मारली व पाच वर्षे सदस्यत्व केल्यानंतर सन २०१७ मध्ये त्यांनी कळवण तालुक्यातील मानूर गटातून पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून विजय संपादन केला. सात वर्षे जिल्हा परिषदेत कामकाज करताना पवार यांनी, ग्रामीण भागातील जनतेच्या अनेक प्रश्नांची तड लावली. त्याचबरोबर सभागृहात आवाज उठविला होता. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदार संघातून डॉ. पवार या राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानल्या जात असताना, पक्षाने मात्र त्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून माजी आमदार धनराज महाले यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज डॉ. भारती पवार यांना भाजपने गळ घातली व तीन वेळा पक्षाचे खासदार राहिलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून पवार यांना दिंडोरी मतदार संघाची उमेदवारी दिली. लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत डॉ. भारती पवार या दणदणीत मतांनी विजयी झाल्या. गेल्या दोन वर्षांपासून मतदार संघातील प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, आरोग्याच्या प्रश्नावर त्यांनी संसदेत तसेच विविध खात्यांच्या केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. उच्चशिक्षित, ग्रामीण भागातील प्रश्नांचा सखोल अभ्यास व कोणत्याही गटा-तटाच्या राजकारणापासून अलिप्त असलेल्या डॉ. भारती पवार यांची वर्णी थेट केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.