जिल्हा परिषद : अध्यक्ष शीतल सांगळे यांची माहिती कुक्कुटपालन केेंद्र स्थलांतरासाठी दोन कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:42 AM2018-03-09T00:42:18+5:302018-03-09T00:42:18+5:30
नाशिक : पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय स्थलांतर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेची नूतन इमारत बांधण्यासाठी ‘बीओटी’चा पर्याय राज्याच्या वित्तमंत्र्यांनी सुचविल्यामुळे जिल्हा परिषदेची नूतन प्रशासकीय इमारत बांधकामाविषयी काहीशी साशंकता व्यक्त केली जात असतानाच पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय स्थलांतर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे इमारतीच्या कामकाजाला लवकरच चालना मिळेल, असा आशावाद जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केला. त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कलजवळ असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागेत सुमारे ५० कोटी रुपये खर्चून जिल्हा परिषदेची सहा मजली नूतन इमारत उभारण्यात येणार आहे. सुमारे १८ हजार २४१ चौरस मीटरमध्ये सदर इमारत उभी करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव आहे. सदर इमारत पर्यावरणपूरक बनविण्याचा मानस जिल्हा परिषदेने केला आहे. तसा प्रस्तावच बांधकाम विभागाने तयार केला आहे. या इमारतीसाठी अध्यक्ष शीतल सांगळे यांनी नाशिक विभागीय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ५० कोटींची मागणी केली होती. तसेच जुन्या कुक्कुटपालन केंद्राच्या जागेसाठी दोन कोटी रुपयांची मागणी त्यांनी मांडली होती. या बैठकीत जिल्हा परिषदेला कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नव्हते. मात्र जिल्हा नियोजन समितीकडे अध्यक्षांनी २ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुटपालन केंद्राच्या स्थलांतराच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर सद्यस्थितीत कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्राची इमारत व निवासस्थाने, प्रशासकीय इमारत आहे. या कार्यालयांचे स्थलांतर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेच शिवाय २ कोटी ६ लाखांचा निधीदेखील मंजूर करण्यात आलेला आहे. सदर प्राप्त निधीतून ई-निविदा काढण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या आहेत.