जिल्हा परिषद शाळा पोषण आहारापासून वंचित
By admin | Published: July 17, 2016 12:59 AM2016-07-17T00:59:01+5:302016-07-17T00:59:12+5:30
संताप : महिन्यापासून धान्य वितरित नाही
बेलगाव कुऱ्हे : शासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार व पूरक पोषण आहार देण्याची तरतूद आहे. या मुलांच्या आहाराचा घास कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, मात्र मुलांना गेल्या महिन्याभरापासून इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील पिंपळगाव डुकरा, भरवीर, भंडारदरावाडी, गिऱ्हेवाडी, निनावी, पिंपळगाव घाडगा येथे पोषण आहाराच्या खिचडीसाठी लागणारे तांदूळ अथवा कोणतेही खाद्य वस्तू अजूनही वितरित झालेल्या नसल्याने मुलांना खिचडी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. या आदिवासी दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून धान्य घेऊन तात्पुरती खिचडी शिजविली जाते. आता धान्यच शिल्लक नसल्यामुळे शाळा हतबल झाल्या आहेत.
जिल्हा ठेकेदाराकडून अद्याप साहित्याचे वाटप झालेले नाही. तालुकास्तरावर काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळांना धान्य वाटप झाले असले तरी, काही शाळा धान्य नाही म्हणून शिक्षण घेणारी आदिवासी मुलेही आहारापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर दिसत आहे.
दररोज शाळेच्या मुलांना खिचडी वाटप करण्याचा शासनाचा
उद्देश आहे; मात्र इगतपुरीच्या शिक्षण
विभागाचे कोणत्याही पद्धतीचे नियोजन नसल्याने त्यांना मुलांच्या पोषण आहाराचा विसर पडला आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पोषण आहारातील धान्य
लवकर शाळेना वाटप करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)