जिल्हा परिषद शाळा आजपासून सकाळच्या सत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:48 AM2019-03-11T01:48:00+5:302019-03-11T01:50:08+5:30
जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्णातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. काही शिक्षक संघटनांनी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती.
नाशिक : जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्णातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. काही शिक्षक संघटनांनी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारपासून (दि.११) जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी ७.५० ते दुपारी १.१५ या वेळेत भरणार असून, शिक्षक वेळेत शाळेत उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांचे लाइव्ह लोकेशन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई व उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्याने वातावरणात बदलाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेत उष्णता वाढली आहे. या परिस्थितीचा विचार करून शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय शिक्षण व क्रीडा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. काही शिक्षक संघटनांनी व सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ११ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या दुपारच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळा आता सोमवार ते गुरुवार सकाळी ७.५० ते १.१५, शुक्रवारी सकाळी ७.५० ते १.०५ तर शनिवारी ७.५० ते १२.०५ या वेळेत भरणार आहेत.
शासन निर्णयानुसार विद्यार्थी गेल्यानंतरही शिक्षकांनी शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी पुढील अडीच तास शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शिक्षक वेळेवर हजर राहिले नाही, किंवा वेळेच्या आत शाळा सोडून गेले तर त्यांची त्या दिवसाची अनधिकृत गैरहजेरी लावण्यात येणार असून, याकामी सरपंच, शालेय समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षणप्रेमी यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बदल करण्यात आला आहे. मात्र तासिकेत बदल झालेला नाही अशी माहिती शिक्षण अधिकारी वैशाली झणकर यांनी दिली.