नाशिक जिल्हा परिषदेने कार्यारंभ आदेश रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 08:06 PM2019-09-21T20:06:20+5:302019-09-21T20:07:46+5:30
विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट निर्माण झाला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्हा परिषदेने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचे कार्यारंभ आदेश जारी केले असून, ती कामे यापूर्वीच सुरू झाली असतील तर ठीक, परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर गुपचूप कामे सुरू करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व कामांची पाहणी करण्याचे आदेश जिल्ह्यातील ग्रामसेवकांना दिले आहेत.
विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, बांधकाम, लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागांचे दप्तर ताब्यात घेतले असून, कोणत्याही नवीन कामांचे आदेश वा पत्रव्यहार करू नये, अशा स्पष्ट सूचना खाते प्रमुखांना देण्यात आल्या. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नवीन कामांचे कार्यारंभ आदेश मोठ्या प्रमाणात देण्यात आले, त्या कामांची यादीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व खाते प्रमुखांकडून मागविली असून, ही यादी निवडणूक विभागाला सादर करण्यात येणार आहे. या नवीन कामांमधील किती कामे प्रत्यक्ष सुरू झाली त्याचीही पाहणी ग्रामसेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जी कामे सुरू झाली आहेत, ती कामे पूर्ण करण्यात येतील परंतु आचारसंहिता लागल्यानंतर अशी कामे गुपचूप सुरू करण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न नाकारता येणार नसल्याचे गृहीत धरून मंजूर कामांची यादी तालुका पातळीवर पाठवून कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तसा प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिला.
शुक्रवारी दुपारी भुवनेश्वरी यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर तालुका पातळीवरदेखील त्याबाबत दक्षता घेण्यासाठी शनिवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांची वाहने जमा करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालयाचा राजकीय प्रचारासाठी वापर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा परिषदेच्या आवारातील पदाधिका-यांची नामफलके झाकण्यात आली आहेत.