जिल्हा परिषदेत दोघे अपक्ष शिवसेनेच्या ‘गळाला’?
By admin | Published: March 4, 2017 12:50 AM2017-03-04T00:50:45+5:302017-03-04T00:51:03+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेत शुक्रवारी (दि. ३) अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकर धनवटे यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेत एक सदस्यांचे संख्याबळ दिवसागणिक महत्त्वाचे ठरू लागले असून, शुक्रवारी (दि. ३) अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकर धनवटे यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत दुसरे अपक्ष रूपांजली विनायक माळेकर यांनाही शिवसेनेने गळ घातल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही या दोन्ही अपक्षांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शहरातील एका आमदाराच्या घरात या दोन्ही अपक्षांची बैठक होऊन त्यात थेट पालकमंत्र्यांशी या दोन्ही अपक्षांचे तीन-चार दिवसांपूर्वीच बोलणेही झाल्याचे समजते. दरम्यानच्या काळात दोन दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा भाजपाच्या एका आमदाराने या दोन्ही अपक्षांची भेट घेऊन त्यांना भाजपाचे सहयोगी सदस्य पद स्वीकारण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यातून या दोन्ही अपक्षांना पदेही कबूल करण्यात आल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात या दोन्ही अपक्षांनी निवडणुकीपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारल्याची चर्चा होती. त्यातच दोन्ही अपक्षांपैकी शंकर धनवटे यांनी समर्थकांचा मेळावा घेत कोणासोबत जावे, याबाबत चर्चा केल्याचे समजते. दरम्यानच्या काळात शंकर धनवटे यांच्यासोबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यापासून जिल्हाप्रमुख सुहास कांदे, विजय करंजकर यांचीही चर्चा झाल्याचे कळते. त्यातूनच मग शंकर धनवटे यांनी शुक्रवारी (दि.३) समर्थकांचा मेळावा घेऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेचे संख्याबळ त्यामुळे २५ वरून २६ होण्याची चिन्हे आहेत. त्यातच हरसूल गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य रूपांजली विनायक माळेकर यांना शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते. तूर्तास शंकर धनवटे वगळता रूपांजली माळेकर यांनी शिवसेनेचे थेट सहयोगी सदस्यपद स्वीकारण्याऐवजी ‘वेट अॅण्ड वॉचची’ भूमिका घेतल्याचे कळते. मात्र शिवसेना नेत्यांनी दोन्ही अपक्ष शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)