आठ माजी सभापतींना जिल्हा परिषदेचे वेध
By admin | Published: February 19, 2017 01:24 AM2017-02-19T01:24:32+5:302017-02-19T01:25:16+5:30
आठ माजी सभापतींना जिल्हा परिषदेचे वेध
नाशिक : जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापतिपद उपभोगलेल्या आजी- माजी पंचायत समिती सभापतींपैकी आठ जणांना मिनी मंत्रालयाचे वेध लागले असून, वेगवेगळ्या तालुक्यांतील पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती विविध गटांमधून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून, गावोगावी प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्यांच्या माध्यमातून उमेदवार आणि पक्षांचे नेते मतदारांना आपली भूमिका पटवून देत त्यांची मने वळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत काही गटांमध्ये पंचायत समित्यांचे आजी-माजी सभापती व उपसभापती मिनी मंत्रालयात जाण्यासाठी आपले नशीब आजमावित आहेत. बागलाण तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी सभापती सीताबाई बागुल वीरगाव गटातून कॉँग्रेसची उमेदवारी करीत आहेत, तर विद्यमान सभापती उषा बच्छाव याही याच राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. कळवण पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड हे कनाशी गटातुन नशीब आजमावत आहेत. सुरगाण्यात माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य मंदाकिनी भोये या हट्टी गटातुन माकपच्या तिकीटावर जिल्हा परिषदेत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिंडोरी तालुक्यातील विद्यमान पंचायत समिती सभापती अलका चौधरी या अहिवंतवाडी गटात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, तर माजी सभापती भास्कर भगरे हे खेडगाव गटातून निवडणूक रिंगणात आहेत. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश बरफ ठाणापाडा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. सिन्नरचे माजी सभापती बाळासाहेब वाघ नांदूरशिंगोटे गटातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.