जि. प. सीईओ आशिमा मित्तल यांना बालस्नेही पुरस्कार
By धनंजय रिसोडकर | Published: November 23, 2023 02:11 PM2023-11-23T14:11:57+5:302023-11-23T14:12:26+5:30
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांच्या हस्ते २०२२-२३ या राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
महाराष्ट्र राज्यात बालकांचा सर्वांगीण विकास, बालहक्क संरक्षण त्यांची सुरक्षा, कुपोषण, आरोग्य या विषयांवर काम करणाऱ्या यंत्रणा व यंत्रणेतील अधिकारी यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास विभाग, सी.सी.डी.टी. संस्था, युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालस्नेही पुरस्कार देण्यात येतो. कुपोषण व्यवस्थापन अंतर्गत कुपोषित बालक व पालक यांचा किलबिल मेळावा, कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण आहार किट वाटप, बाल अंगणवाडी अशा विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न हा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रताप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्यासह नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रताप पाटील यांनी सांगितले.