जि.प. इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:39 AM2021-01-02T00:39:18+5:302021-01-02T00:40:18+5:30
नवीन वर्षाचा मुहूर्त साधत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या तीन वर्षांत ही इमारत पूर्ण करावयाची आहे.
नाशिक : नवीन वर्षाचा मुहूर्त साधत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या तीन वर्षांत ही इमारत पूर्ण करावयाची आहे. गेल्या वर्षी जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या या जागेवर सोळा कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यात नूतन प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठीची शासन परवानगी, निधीची पूर्तता आदी बाबी पूर्ण करण्यात कालापव्यय झाला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र कोरोनामुळे इमारतीच्या निविदा व अन्य कारणांमुळे काम पुढे सरकू शकले नव्हते. गेल्या महिन्यात कामाची निविदा मंजूर करण्यात येऊन ३१ डिसेंबर रोजी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले व दुसऱ्याच दिवशी १ जानेवारीचा मुहूर्त साधत कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर, सुरेखा दराडे, दीपक शिरसाठ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी उपस्थित होते.