साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा परिषद करणार औषध खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 06:41 PM2020-06-17T18:41:35+5:302020-06-17T18:41:56+5:30
सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले तरी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यातच मान्सूनचे आगमन झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात साथरोगाचे आव्हानही कायम असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचे ठरविले आहे. या खरेदीला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने नुकतीच मान्यता दिली आहे.
सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले तरी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. एकीकडे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व दुसरीकडे येऊ घातलेल्या साथरोगाचे संभाव्य आव्हान आरोग्य विभागापुढे ठाकले आहे. तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात दूषित पाणी विहिरीत मिसळून ग्रामीण भागात सहा जणांचा बळी तर शेकडोंना साथीच्या रोगाने ग्रासले होते. दरवर्षी दूषित पाणी व बदलेल्या हवामानामुळे साथीचे आजार पसरत असतात. त्यामुळे यंदाचे संभाव्य संकट लक्षात घेता आरोग्य विभागाने पावणेतीन कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाासनाने ठरवून दिलेल्या हाफकिन संस्थेने निश्चित केलेल्या औषधांच्या दरानुसारच ही खरेदी केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या खरेदीस मान्यता देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने ३३७ औषधांचा समावेश आहे. हे औषधे आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५९२ उपकेंद्रांना पुरविली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली आहे.