CoronaVirusVaccine : सिरम तयार करणार लसींचे १ अब्ज डोस, २०२१ पासून प्रत्येक तिमाहीत किमान १ लस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 09:08 AM2020-10-24T09:08:35+5:302020-10-24T09:12:55+5:30
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनेका या कंपनीशी भागीदारी केली आहे.
मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पाच वेगवेगळ्या कोरोना लसींचे १ अब्ज डोस तयार करणार आहे. जगभरात या लसींचे वितरण केले जाईल. कोविशिल्ड, कोवोवॅक्स, कोविव्हवॅक्स, कोविवॅक आणि एसआयआय या लसींचा त्यात समावेश आहे. २०२१ च्या वर्षाअखेरीपर्यंत हे डोस तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनेका या कंपनीशी भागीदारी केली आहे. ४ आम्ही आधीच २ ते ३ कोटी डोस तयार करत असून ही संख्या महिन्याला ७ ते ८ कोटींपर्यंत नेऊ शकतो. मात्र, लसीच्या आयुर्मानाची मर्यादा लक्षात घेता आम्ही जाणीवपूर्वक कमी उत्पादन करत आहोत, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. कोवोवॅक्स ही दुसरी लस सिरम इन्स्टिट्यूट लाईफ सायन्सेस या नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या कंपनीमार्फत विकसित केली जाणार आहे.
बायोटेक कंपनी नोवोवॅक्सच्या सहयोगाने ही लस तयार केली जात आहे. कोवोवॅक्स लसीची पहिली चाचणी मे २०२० मध्ये आॅस्ट्रेलियात सुरू झाली. तिचा दुसरा टप्पा आता सुरू होईल. २०२१ मध्ये सिरमच्या मदतीने १ अब्ज डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.
कोविशिल्डपासून सुरुवात
कोविशिल्ड या लसीपासून आम्ही सुरुवात करणार असून २०२१ च्या सुरुवातीपासून प्रत्येक तिमाहीत किमान एक लस लाँच करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अदर पुनावाला, सीईओ, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया