निवृत्त वनक्षेत्रपालाकडे १ कोटीची बेहिशेबी मालमत्ता
By admin | Published: May 6, 2014 09:18 PM2014-05-06T21:18:49+5:302014-05-07T00:10:17+5:30
अटक : अँटीकरप्शन ब्युरोकडून झाडाझडती
औरंगाबाद : वन विभागातील आपल्या ३१ वर्षांच्या सेवा काळामध्ये श्रीधर तुपे यांनी १ कोटी ६ लाख २३ हजार ८०५ रुपयांंची अपसंपदा कमावली असल्याचे आज मंगळवारी निष्पन्न झाले. पहाटेच त्यांच्या सातारा परिसरातील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली आहे.
कोळघर, ता. औरंगाबाद येथील रहिवासी श्रीधर भिवाजी तुपे हे सन २००८ मध्ये वनक्षेत्रपाल पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी वन विभागात १९७७ सालापासून नोकरी केली. सुरुवातीला ते वनपाल म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे रुजू झाले होते. त्यांनी कायदेशीर मार्गाने मिळणार्या उत्पन्नापेक्षा कोट्यवधी रुपयांची अपसंपदा कमावल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ४ पोलीस उपअधीक्षक, ४ निरीक्षक व कर्मचार्यांचा मोठा फौजफाटा सातारा परिसरातील त्यांच्या निवासस्थानावर धडकला. त्यांनी निवासस्थानाला घेरल्यानंतर लगेच आत जाऊन सर्व मालमत्तांची कागदपत्रे ताब्यात घेतली. तब्बल ७ तास ही तपासणी सुरू होती. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पोलीस आपल्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी श्रीधर तुपे यांना अटक केली.
पोलिसांनी घराची झडती घेतली असता हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार कोळघर येथे श्रीधर तुपे यांच्या नावे ६ एकर १९ गुंठे शेती, पत्नी पद्माबाई तुपे यांच्या नावे १२ एकर ३५ गुंठे, मुलगा शरद तुपे यांच्या नावे ८ एकर ११ गुंठे, मुलगी जयश्री हिच्या नावे ६ एकर २० गुंठे, सुजाता हिच्या नावे ४ एकर ७ गुंठे, सुनीता हिच्या नावे ५ एकर ३७ गुंठे व मीना हिच्या नावे ५ एकर २० गुंठे शेती खरेदी करण्यात आलेली आहे. यातील काही शेतीमध्ये १२ लाख रुपये खर्चून पाईपलाईन टाकलेली आहे, तर काही ठिकाणी १० लाख रुपये खर्च करून शेततळे व ठिबक सिंचन केलेले आहे.
कोळघर येथे तुपे यांचे १२ लाख रुपयांचे घर, पिंप्रीराजा येथे मुलगा शरद यासाठी २४ लाख रुपयांचे दुमजली हॉस्पिटल उभारलेले आहे. सातारा परिसरात ३३ लाख रुपयांचे घर व ठाणे जिल्ह्यात ४ लाख १० हजार रुपयांचा फ्लॅट खरेदी केलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या नावे औरंगाबाद व ठाणे येथे एकूण १४ बँक खाती आहेत. त्यांनी स्कॉर्पिओ, टाटा सुमो, ट्रॅक्टर, बुलेट मोटारसायकल अशी वाहनेही खरेदी केलेली आहेत.
या प्रकरणात श्रीधर तुपे यांच्यासह अपसंपदेत सहभागी पत्नी पद्माबाई, मुलगा शरद, मुली सुनीता, मीना, जयश्री, सुजाता यांच्या विरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई यशस्वी करण्यासाठी अँटीकरप्शन ब्युरोचे अधीक्षक सं. दे. बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक भा. ब. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुरेश वानखेडे, रामनाथ चोपडे, प्रताप शिकारे, साईनाथ ठोंबरे, प्रवीण मोरे, जालन्याचे उपअधीक्षक एच. व्ही. गिरमे, निरीक्षक एस. ए. एस. सय्यद, शामसुंदर कौठाळे, किशोर पवार, ए. व्ही. रायकर, नीलेश देसले, श्यामसुंदर टाक यांनी परिश्रम घेतले.