शेती शिकणाऱ्या विद्यार्थिनीची भरारी; करणार 1 कोटीची वार्षिक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:04 PM2019-04-04T16:04:50+5:302019-04-04T16:06:39+5:30
कॅनडात मल्टी नॅशनल कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करणार
जालंधर: देशात पहिल्यांदाच कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्याला 1 कोटींचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे. बेयर ग्रुपच्या मॉन्सेंटो कंपनीनं पंजाबच्या कविता फमनला तब्बल 1 कोटींचं पॅकेज दिलं आहे. गुरुदासपूरची रहिवासी असणारी कविता जालंधरच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून शेती विषयात एमएससी करते आहे. तिला 2,00,000 कॅनेडियन डॉलरचं (1 कोटी 2 लाख रुपये) पॅकेज देण्यात आलं आहे.
मॉन्सेंटोनं कॅनडा विभागाच्या मॅनिटोबा ऑफिसमधील उत्पादनाची जबाबदारी कविताकडे सोपवली आहे. कविता उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करेल. या महिन्यापासून ती काम सुरू करणार आहे. कंपनीत होणारं उत्पादन तिच्या अंतर्गत येईल. उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियोजन आणि समन्वय राखण्याची जबाबदारी तिच्याकडे असेल. या नोकरीसाठी सुरुवातीला कवितानं एक परीक्षा दिली होती. त्यानंतर मॉन्सेंटोच्या अधिकाऱ्यांनी तिची मुलाखत घेतली.
मॉन्सेंटोनं दिलेल्या ऑफरनं स्वप्न सत्य उतरल्याची भावना कवितानं बोलून दाखवली. 'तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात बदल होत आहेत. अनेक अत्याधुनिक गोष्टींचा समावेश शेतीत केला जात आहे. त्यामुळेच कंपनीत रुजू होण्याआधीच मला अतिशय उत्साही वाटतं आहे. मी पुढील काही वर्षे शक्य तितक्या नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेन,' असं कवितानं सांगितलं. कवितानं मिळवलेल्या यशाबद्दल विद्यापीठानं आनंद व्यक्त केला. आतापर्यंत कृषी विभागातील विद्यार्थ्यांला कधीच इतकं मोठं पॅकेज मिळालं नव्हतं, असं एलपीयूचे संचालक अमन मित्तल यांनी म्हटलं. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्याला पहिल्यांदाच सात आकडी पगार मिळाला आहे. विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच कविताला इतक्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यानं अतिशय आनंद झाल्याचं मित्तल म्हणाले.