पोलीस हुतात्म्यांना १ कोटी, एकविसाव्या शतकात संयम आवश्यक - राजनाथ सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:57 AM2017-10-08T01:57:20+5:302017-10-08T01:59:20+5:30
देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली.
मेरठ : देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली. पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात राजनाथ सिंह बोलत होते.
एकविसाव्या शतकातील पोलिसांनी क्रूरपणे वागून चालणार नाही. पोलिसांनी सभ्यपणेच वागायला हवे आणि दंगली व निदर्शनांसारख्या आव्हानात्मक स्थितीचा सामना करताना, पोलिसांनी संयम ठेवायला हवा, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे शनिवारी केले.
केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पोलीस दलांना आवाहन करताना, राजनाथ सिंग म्हणाले की, दंगली आणि निदर्शनांसारख्या परिस्थितीत गर्दीला नियंत्रित करण्यासाठी
संपूर्ण नवीन तंत्रज्ञान आणि
मानसिक उपाययोजना करायला हव्यात. जात, धर्म आणि प्रादेशिकवाद या आधारे देशाला तोडू पाहणाºया शक्तींवर पोलिसांनी प्रभावी लक्ष ठेवायला हवा.
राजनाथ सिंह म्हणाले की, आपण एकविसाव्या शतकात वावरताना पोलीस दलाने क्रूर असू नये. पोलिसांना सर्वांशी सभ्यपणच वागावे लागेल. सामान्यांपासून आंंदोलक असोत, संशयित असोत वा आरोपी, या सर्वांशी पोलिसांना चांगलीच वागणूक द्यायला हवी. कधी-कधी पोलिसांना कठोर व्हावे लागते, हे मी समजू शकतो. मात्र, अशा परिस्थितीतही संयम बाळगणे आवश्यक आहे.
‘कमी कठोरता असलेला मार्ग शोधण्याच्या सूचना मी ‘ब्युरो आॅफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ला यापूर्वीच दिल्या आहेत,’ असे
सांगून गृहमंत्री राजनाथ सिंह
म्हणाले की, ‘सर्वच पोलिसांनी कमीतकमी बळाचा वापर करून अधिकाधिक परिणाम प्राप्त करायला हवा.’ (वृत्तसंस्था)
राजनाथ सिंह म्हणाले की, द्रुत कृती दलाच्या सध्या १0 बटालियन कार्यरत आहेत. संवेदनशील असलेल्या १0 शहरांत त्या स्थापित आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना आता तयार गणवेश दिला जाणार नाही.
त्याऐवजी १0 हजारांचा गणवेश भत्ता त्यांना दिला जाईल. सुरक्षा दलांतील १0 लाख जवानांना योग्य वेळी पदोन्नती मिळावी, यासाठी उपाय शोधण्यावर गंभीरपणे विचार केला जात आहे.