चार वर्षांत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या बांधकामासाठी १ लाख कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:23 AM2020-12-01T02:23:53+5:302020-12-01T02:24:19+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात ५० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्या निमित्ताने रस्तेबांधणीसाठी महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटी रुपयांचा निधी आला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात ५० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रात नऊ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी मंत्रालयाने एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे.
४ लाख ८७ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च
सुमारे ६ लाख कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत त्यातील ४ लाख ८७ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. २०२२ पर्यंत १ हजार ४४० राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले आहेत.