बॅंकांतील १ लाख कोटी तुमचे तर नाहीत?; यापुढे सर्व खातेदारांकडून ‘नाॅमिनेशन’ भरून घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:08 AM2023-09-06T07:08:30+5:302023-09-06T07:08:48+5:30
दावेदार पुढे येईनात
नवी दिल्ली : केवळ बँकिंग प्रणालीमध्ये ३५ हजार कोटी रुपये बेवारस पडून आहेत. या रकमेवर कोणीही दावा सांगितलेला नाही.
सर्व वित्तीय प्रणालीतील बेवारस रक्कम तब्बल १ लाख कोटी रुपये असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दाव्यांअभावी पडून असलेल्या ठेवी उत्तराधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर असून या ठेवींचे प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे सर्व खातेदारांकडून आपला उत्तराधिकारी नामित केला जाईल याची खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिल्या. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये (जीएफएफ) त्या बोलत होत्या.
‘राउंड ट्रिपिंग’मुळे अर्थव्यवस्थेला धोका
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, कर स्वर्ग (टॅक्स हेवन) देश आणि पैशांची ‘राउंड ट्रिपिंग’ यापासून जबाबदार वित्तीय व्यवस्थेस धोका आहे. आपली विक्री वाढवून दाखविण्यासाठी संपत्ती इतरांना विकून पुन्हा खरेदी करण्यास राउंड ट्रिपिंग म्हटले जाते. वित्तमंत्र्यांनी फिनटेक कंपन्यांना सायबर सुरक्षेसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहनही केले आहे. विश्वास फारच महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘उद्गम पोर्टल’ सुरू
बँकांमधील मुदत ठेवींत (एफडी) बेवारस पडून असलेले हजारो कोटी रुपये योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एक मोहीम राबविली होती. त्यासाठी ‘उद्गम पोर्टल’ही सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता वित्तमंत्र्यांचे हे निवेदन आले आहे.
मी सांगू इच्छिते की, बँकिंग प्रणाली व वित्तीय प्रणालीसह म्युच्युअल फंड व शेअर बाजार अशा सर्वच क्षेत्रात जेव्हा कोणी पैशांची देवाणघेवाण करतो, तेव्हा संस्थांना भविष्याबाबत विचार करावा लागेल. ग्राहक आपला उत्तराधिकारी नामित करतील
तसेच त्याचे नाव, पत्ता नोंदवतील, याची खात्री करावी लागेल. - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री