‘तेजस’मध्ये २५ लाखांचा नि:शुल्क विमा; दिल्ली-लखनौ गाडीबाबत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:50 AM2019-09-13T01:50:28+5:302019-09-13T06:44:54+5:30
आरामदायी सुविधांचाही समावेश
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन मंडळाने (आयआरसीटीसी) प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला २५ लाख रुपये नि:शुल्क विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे आरामदायी प्रवासासाठी कमी किमतीत सामानाची ने-आण, टॅक्सी, हॉटेल बुकिंग यांसारख्या सुविधाही देण्यात येणार आहेत.
पहिल्यांदाच एखाद्या गाडीची पूर्ण जबाबदारी आयआरसीटीसीकडे सोपवण्यात आली आहे. प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी काही रेल्वे गाड्या खासगी संस्थांमार्फत चालवण्याचा निर्णय सरकारकडून १०० दिवसांच्या आत घेण्यात येणार होता. तेजस एक्स्प्रेस आयआरसीटीसीकडे सोपवून सरकारने त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
आयआरसीटीसीच्या दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना २५ लाख रुपये विमा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लखनौ स्थानकात प्रतीक्षालय आणि नवी दिल्ली स्थानकावर प्रवाशांसाठी सुसज्ज बैठकव्यवस्था करण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. या गाडीमध्ये सवलत, विशेष सुविधा आणि नोकरीचा पासची सुविधा उपलब्ध असणार नाही. तसेच, पाच वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना पूर्ण तिकीट घ्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गाडीत चहा, कॉफी, पाणी मोफत दिले जाणार असून विमानाप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून जेवण देण्यात येणार आहे.
आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावणार असून मंगळवारी ती बंद ठेवण्यात येणार आहे. गाडी दिल्लीतून सायंकाळी साडेचार वाजता सुटणार असून रात्री पावणे अकरा वाजता लखनौ येथे पोहोचेल.
तात्काळ कोट्याला बगल
दिल्ली-लखनौ गाडीत तात्काळ कोट्याला बगल देण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह श्रेणी आणि एसी चेअर कार श्रेणीच्या प्रत्येक डब्यात पाच जागा परदेशी पर्यटकांसाठी आरक्षित असणार आहेत. गाडीचे भाडे मागणी आणि सण यांनुसार बदलण्यात येणार आहे. या गाडीसाठी प्रवासाआधी किमान दोन महिने अगोदर बुकिंग करता येणार आहे. सामूहिक बुकिंगसाठी एका डब्यात ७८ जागा असणार असून आॅनलाईन सुविधा उपलब्ध आहे.