मार्क्सवाद्यांचे १ लाख सोशल मीडिया व्हॉलेंटिअर्स तयार
By Admin | Published: February 10, 2016 01:28 AM2016-02-10T01:28:01+5:302016-02-10T01:28:01+5:30
पश्चिम बंगालमधे काँग्रेस आणि डावी आघाडी एकीकडे निवडणूकपूर्व युतीसाठी आतूर आहेत तर दुसरीकडे छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसची हडेलहप्पी व दादागिरी
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधे काँग्रेस आणि डावी आघाडी एकीकडे निवडणूकपूर्व युतीसाठी आतूर आहेत तर दुसरीकडे छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसची हडेलहप्पी व दादागिरी एक्सपोज करून निवडणूक आयोगाकडे पाठवण्यासाठी खास रणनीती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आखली आहे. आपल्या काडरमधे संपूर्ण राज्यात १ लाख सोशल मीडिया स्वयंसेवक (व्हॉलेंटिअर्स) तयार करण्याचा प्रयोग मार्क्सवाद्यांनी सुरू केला असून तृणमूलचे कार्यकर्ते राज्यात जिथे कुठे अशांतता पसरवण्याचे प्रयोग करतील, त्यावर विनाविलंब कारवाईसाठी छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्सव्दारे ही माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल, अशी माहिती दिल्लीतल्या सीपीएम मुख्यालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पश्चिम बंगालमधे यंदा विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत तृणमूलचे कार्यकर्ते जागोजागी दहशतीचे वातावरण निर्माण करून गोंधळ घालतील. सामान्य मतदारांना भयभीत करतील, असा दाट संशय डाव्या आघाडीच्या नेत्यांना आहे. दहशत आणि दमदाट्यांचे असले प्रयोग, मतदानात अडथळे आणण्याच्या घटना, मतदान अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयोग कुठेही आढळल्यास, डाव्या आघाडीचे जागोजागी विखुरलेले १ लाख स्वयंसेवक (मार्क्सवाद्यांनी त्यांचे नामकरण सोशल मीडिया रिपोर्टर्स असे केले आहे) व्हिडीओ क्लिप्स व छायाचित्रात कैद करतील आणि सोशल मीडियाव्दारे पुराव्यादाखल थेट पक्षाच्या मुख्यालयाकडे पाठवतील. योग्य खातरजमा केल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत त्या घटनांची रितसर तक्रार निवडणूक आयोगाकडे केली जाईल. सीपीएम कार्यालय त्यासाठी एक खास अॅप तयार करणार आहे. राज्यातली आगामी निवडणूक नि:पक्ष वातावरणात व्हावी, त्यासाठी ही योजना आहे, असे या सूत्रांनी सांगीतले.
लोकसभेच्या २0१४ सालच्या निवडणुकीपासून जनमानसावर सोशल मीडियाचा प्रभाव किती वेगाने वाढला, त्याचे ताजे उदाहरण पश्चिम बंगालमधे मार्क्सवाद्यांनी प्रथमच या अस्त्राच्या परिणामकारक वापरासाठी चालवलेली जोरदार तयारी आहे.