१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:44 IST2025-02-15T16:42:21+5:302025-02-15T16:44:44+5:30

Ayodhya Ram Mandir: भाविकांची गर्दी इतकी मोठी आहे की, ज्यांना दानपेटीत पैसे टाकता येत नाहीत, ते बाहेरच दानाची रक्कम ठेवत आहेत, असे सांगितले जात आहे.

1 month 1 crore devotees took ram lalla darshan 15 crore donated to ayodhya ram mandir and number is increasing every day | १ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय!

१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय!

Ayodhya Ram Mandir: १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे अयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्री या काळात महाकुंभमेळा होत आहे. महाकुंभमेळा सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आणि या एका महिन्यात तब्बल ५० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी या अद्भूत आणि दुर्लभ योगाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर लाखो भाविक, पर्यटक अयोध्येत जाऊन राम मंदिरात रामललाचे दर्शन घेत आहेत. दररोज हा आकडा वाढतच चालला आहे. केवळ भाविक नाही, तर राम मंदिरात भाविकांकडून देण्यात येणारा आकडाही वाढत चालला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभमेळ्यानंतर भाविक अयोध्येत दाखल होत असल्यामुळे राम मंदिर व्यवस्थापनावरील ताण वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे ३ लाखांहून अधिक भाविक अयोध्येत येत असून, राम मंदिरात रामललाचे दर्शन घेत आहेत. महाकुंभमेळ्यातून दररोज अयोध्येत येणाऱ्या भाविकांसह राम मंदिराला मिळणाऱ्या दानाचे विक्रमही मोडले जात आहेत. महाकुंभात स्नान केल्यानंतर लाखो भाविक अयोध्येकडे निघाले आहेत. राम मंदिरात दररोज सुमारे ४ लाख भाविक दर्शन घेत आहेत. 

१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान

साधारण १४ जानेवारीपासून अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रंचड वाढ सुरू झाली आहे. एका महिन्यात एक कोटींहून अधिक भाविकांनी श्रीरामललाचे दर्शन घेतले आहे. महाशिवरात्रीपर्यंत भाविक मोठ्या प्रमाणात अयोध्येत येण्याचा सिलसिला सुरू राहण्याची अपेक्षा आहे. राम मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे की, ट्रस्टच्या १० देणगी काऊंटरवर दररोज १० लाख रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली जात आहे. महाकुंभाच्या १ महिन्यात १५ कोटी रुपयांहून अधिक दान जमा झाले आहे. यामध्ये रामललासमोर ठेवलेल्या ६ दानपेटीत जमा झालेल्या रकमेचाही समावेश आहे. भाविकांची गर्दी इतकी मोठी आहे की, ज्यांना दानपेटीत पैसे टाकता येत नाहीत, त्यांनी ते बाहेरच ठेवावे लागत आहे. कारण गर्दीच्या दबावामुळे लोकांना थांबायला वेळ मिळत नाही. महाकुंभाच्या आधीही मंदिरात दरमहा सुमारे ३ कोटी रुपये देणग्या स्वरूपात जमा होत होते.

दरम्यान, दान, देणगीची रक्कम मोजण्याची जबाबदारी बँकेकडे सोपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. देणगीची रक्कम मोजण्यासाठी यंत्रे बसवण्यात आली आहेत. १५ बँक कर्मचाऱ्यांच्या टीममध्ये वरिष्ठ व्यवस्थापकांचा समावेश आहे. टीमचे समन्वय साधण्यासाठी मंदिर ट्रस्टच्या प्रभारी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज मोजणी केल्यानंतर, पैसे ट्रस्टच्या बँकेतील खात्यात जमा केले जातात. राम मंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्याच दिवशी तब्बल ३.१७ कोटी रुपयांचे दान मिळाले. यानंतर, पुढील १० दिवसांत ११ कोटी रुपयांहून अधिक दान, देणगी मिळाली. ऑगस्ट २०२४ मध्ये राम मंदिर ट्रस्टने सांगितले होते की, ट्रस्टला देश-विदेशातून सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे देणगी मिळाले आहे.

 

Web Title: 1 month 1 crore devotees took ram lalla darshan 15 crore donated to ayodhya ram mandir and number is increasing every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.