उपहार अग्निकांड मालकास १ वर्षाची कैद
By admin | Published: February 10, 2017 01:06 AM2017-02-10T01:06:24+5:302017-02-10T01:06:24+5:30
उपहार अग्निकांडप्रकरणी एक वर्ष तुरुंगवास भोगण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बांधकाम व्यावसायिक गोपाल अन्सल यांना दिला
नवी दिल्ली : उपहार अग्निकांडप्रकरणी एक वर्ष तुरुंगवास भोगण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बांधकाम व्यावसायिक गोपाल अन्सल यांना दिला. १९९७ मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत ५९ लोकांनी प्राण गमवावे लागले होते.
मात्र या दुर्घटनेत मृत्यू पडलेल्यांचे नातेवाईक, जखमी तसेच त्यांचे वकील यांनी या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात तरी आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही, या शब्दांत त्यांनी आजच्या निकालानंतर दु:ख व्यक्त केले. अन्सल बंधूंना किमान जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल, अशी त्या सर्वांची अपेक्षा होती.
न्यायालयाने एक वर्षातील उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी चार आठवड्यांत आत्मसमर्पण करा, असे गोपाल यांना सांगितले. २ विरुद्ध १, अशा बहुमताने निकाल देताना न्यायालयाने गोपाल यांचे ज्येष्ठ बंधू सुशील अन्सल यांच्या वयाचा विचार करून त्यांना दिलासा दिला. त्यांनी जेव्हढी शिक्षा भोगली तेव्हढीच शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागणार नाही.
न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि कुरियन जोसेफ यांनी सुशील आणि गोपाल अन्सल यांना यापूर्वी ठोठावलेला प्रत्येकी ३० कोटींचा दंड अधिक नसल्याचेही निकालात सांगितले. न्यायमूर्ती गोगोई आणि जोसेफ यांनी बहुमताने हा निकाल दिला, तर न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी या निकालाशी असहमती दर्शविली.