वाहतूक कोंडीची जगातील १० पैकी ४ शहरे भारतात, टॉमटॉमचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:36 AM2020-01-30T05:36:56+5:302020-01-30T05:37:12+5:30
टॉमटॉम ही आघाडीची ई-व्हेईकल नेव्हिगेशन कंपनी.
गुवाहाटी : वाहतूक कोंडीचा अत्यंत वाईट फटका बसणारा देश आहे भारत. टॉमटॉमच्या माहितीनुसार जगात कमालीची वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या १० पैकी चार शहरे (बंगळुरू, पुणे, दिल्ली आणि मुंबई) ही भारतातील आहेत. वाहतूक कोंडीमुळे तासन्तास कारमध्ये बसून राहणे सगळ्यांना नकोसे झाले आहे; परंतु वर्षामागून वर्षे जगातील महत्त्वाच्या शहरांत वाहतुकीचा व वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. कारण गेल्या दहा वर्षांत वाहनांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. अमेरिका किंवा चीनमध्ये जेवढ्या कार विकल्या जातात त्यापेक्षा त्या भारतात कमी विकल्या जात असल्या तरी वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त त्रास भारतीयांना सहन करावा लागतो आहे.
टॉमटॉम ही आघाडीची ई-व्हेईकल नेव्हिगेशन कंपनी. तिने सहा खंडांतील ५७ देशांत ४१६ शहरांत पाहणी करून वार्षिक वाहतूक निर्देशांक (अॅन्युएल ट्रॅफिक इंडेक्स) जारी केला. कंपनीचे हे नववे वर्ष असून, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स जगात शहरी भागांत वाहतुकीची कोंडी नेमकी कोणत्या वेळी होते व वाहतूक कोंडीचा इतिहास उपलब्ध करून देतो. भारतातील माहिती व तंत्रज्ञान केंद्र बंगळुरू शहर जगात वाहतूक कोंडीसाठी कुख्यात आहे. तेथे वाहतूक कोंडी सर्वात जास्त ७१ टक्के आहे. २० आॅगस्ट, २०१९ हा (मंगळवार) दिवस सर्वात वाईट ठरला. त्या दिवशी १०३ टक्के वाहतूक कोंडी होती.
६ एप्रिल (शनिवार) रोजी ती फक्त ३० टक्के होती. अहवालात म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री आठनंतर प्रवास केल्यास तुमचे वर्षाला पाच तास वाचू शकतात. वाहतूक कोंडीमुळे सरासरी २४३ तास (१० दिवस, तीन तास) वाया जातात. बंगळुरूनंतर मनिला (फिलिपिन्स) शहरात ७१ टक्के वाहतूक कोंडी आहे. जगात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणाºया पाच शहरांत मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. त्यांचा क्रम अनुक्रमे चौथा व पाचवा आहे. कोलंबियातील बोगोटाचे स्थान तिसरे आहे. दिल्लीचा क्रमांक आठवा, तर मॉस्को (रशिया), लिमा (पेरू), इस्तंबूल (टर्की) आणि जकार्ता (इंडोनेशिया) हे अनुक्रमे सहा, सात, नऊ आणि दहाव्या पायरीवर आहेत.
अशी ठरते टक्केवारी
- वाहतूक कोंडीच्या टक्केवारीचा नेमका अर्थ असा. उदा. बँकॉकमध्ये वाहतूक कोंडी ५३ टक्के पातळीची असेल, तर त्याचा अर्थ असा की, बँकॉकमधील वाहतूक कोंडी नसलेल्या परिस्थितीचा (बेसलाईन) आधार घेतल्यास प्रवासाला ५३ टक्के जास्त वेळ लागतो. टॉमटॉम प्रत्येक शहरात बेसलाईनचे गणित मांडते.
- वर्षात ३६५ दिवसांत संपूर्ण रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना सहजगत्या जाता- येता येईल त्या वेळेचे विश्लेषण करून बेसलाईन ठरवते. ही डच कंपनी शहरांचा दर्जा प्रवासाला सरासरी जास्तीचा वेळ किती लागला यावरून ठरवते.
- कोणत्या वेळी वाहतूक कोंडी सर्वात जास्त व सर्वात कमी होती आणि वाहनचालकांना पुढचे वाहन सरकण्यासाठी किती वेळ वाया घालवावा लागला हेदेखील विचारात घेतले जाते.
- मुंबईत ९ सप्टेंबर, २०१९ रोजी ६५ टक्के वाहतूक कोंडी होती. हा दिवस सगळ्यात वाईट होता. मुंबईकरांनी सरासरी २०९ तास वाहतूक कोंडीत गमावले. २ आॅगस्ट, २०१९ रोजी पुण्यात ५९ टक्के वाहतूक कोंडी होती व हा दिवस त्याच्यासाठी वाईट ठरला.
- या कोंडीमुळे पुणेकरांनी १९३ तास गमावले. दिल्लीत ५६ टक्के वाहतूक कोंडी आहे. २३ आॅक्टोबर, २०१९ हा दिवस राजधानीसाठी वाईट ठरला. त्या दिवशी १९० तास वाहनचालकांना गमवावे लागले.
- भारतातील चार शहरांत सर्वात जास्त कार्स या दिल्लीत आहेत. या आधीच्या अभ्यासात भारतातील मेट्रो शहरांमध्ये दिल्लीतील रस्त्यांची अवस्था चांगली असल्याचा निष्कर्ष निघाला होता.