10-50-100-200-500-2000! नोटांनी सजला देवीचा दरबार; पताका व किंमत पाहून डोळे विस्फाराल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 02:56 PM2021-10-12T14:56:23+5:302021-10-12T15:00:23+5:30
Kanyaka Parameswari Temple decoration Trending: 2020 मध्ये कन्याका मंदिराला 1 कोटी रुपयांच्या नोटांनी सजविले होते. गेल्या वेळी हार आणि गुच्छ बनविण्यासाठी 1,11,111 रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या होत्या, असे सांगितले जाते.
आंध्र प्रदेशच्या नेल्लोर येथील कन्याका परमेश्वरी मंदिरात (Kanyaka Parameswari Temple) 10 ते 2000 रुपयांच्या नोटांनी बनविलेले पेंडाल पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे. हे मंदिर आणि परिसर जवळपास 5 कोटींहून अधिक रकमेच्या नोटांनी सजविण्यात आलेले आहे. या मंदिरात वर्षभर वेळोवेळी देवीच्या वेगवेगळ्या रुपांत पूजा केली जाते. नऊ दिवसांच्या नवरात्री- दसऱ्याच्या सणात तिला धनलक्ष्मीच्या रुपात सजविले जाते.
100 हून अधिक स्वयंसेवकांनी 5 कोटी 16 लाख रुपयांच्या नोटांनी मंदिर सजविण्याचे काम केले. यासाठी 2,000 रुपये, 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी 11 कोटी रुपये खर्च करून जुन्या कन्याका परमेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तेव्हापासून नवरात्रोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यंदादेखील मोठा शो करण्यात आला आहे.
नेल्लोर शहर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष मुक्कला द्वारकानाथ यांनी सांगितले की, 7 किलो सोने आणि 60 किलो चांदी देवीला सजविण्यासाठी वापरली आहे. काही ठिकाणी नोटांनी देवतांची पूजा केली जाते. तर नेल्लोरमध्ये एवढी रक्कम फक्त पताकांसारखी वापरणे असमान्य आहे.
2020 मध्ये कन्याका मंदिराला 1 कोटी रुपयांच्या नोटांनी सजविले होते. गेल्या वेळी हार आणि गुच्छ बनविण्यासाठी 1,11,111 रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या होत्या, असे सांगितले जाते.