पाटण्यात स्फोट मालिका खटल्यात १० जण दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 05:35 AM2021-10-28T05:35:10+5:302021-10-28T05:39:03+5:30
Patna blast case : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राजकीय सभेच्या ठिकाणी हे स्फोट झाले होते. विशेष एनआयए न्यायाधीश गुरविंदर मेहरोत्रा यांनी वरील आदेश दिला, तसेच एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
पाटणा : २०१३ मध्ये येथे झालेल्या मालिका स्फोट खटल्यात विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयाने बुधवारी १० जणांना दोषी ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राजकीय सभेच्या ठिकाणी हे स्फोट झाले होते. विशेष एनआयए न्यायाधीश गुरविंदर मेहरोत्रा यांनी वरील आदेश दिला, तसेच एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
एनआयएने ११ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यात एक अल्पवयीन होता. त्याचे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे सोपवले गेले होते.
‘दोषी ठरलेल्यांना १ नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावली जाईल,’ असे विशेष सरकारी वकील ललन प्रसाद सिंह यांनी सांगितले. एनआयएच्या वतीने सिंह यांनी बाजू मांडली.
दोषी ठरलेल्यात इम्तियाझ अन्सारी, मुजिबुल्लाह, हैदर अली, फेरोझ अस्लम, ओमर अन्सारी, इफ्तेखार, अहमद हुसेन, उमर, सिद्दिकी आणि अझरुद्दीन यांचा समावेश आहे. फकरुद्दीनची निर्दोष मुक्तता झाली. गांधी मैदानावर २७ ऑक्टोबर, २०१३ रोजी नरेंद्र मोदी भाजपच्या हुंकार रॅलीत बोलत असताना स्फोट झाले होते.