समाधानकारक : भारतात कोरोनाशी यशस्वी लढा, उपचारानंतर 11 रुग्ण ठणठणीत बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:43 PM2020-03-14T12:43:20+5:302020-03-14T12:56:58+5:30
केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार याशिवाय दिल्लीतील 7 आणि तेलंगानातील एकमात्र कोरोना बाधित रुग्णही बरा झाला आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच एक आनंदाची बातमी आली आहे. देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 11 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून ते ठणठणीत बरेही झाले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यात समावेश असलेल्या केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार याशिवाय दिल्लीतील 7 आणि तेलंगानातील एकमात्र कोरोना बाधित रुग्णही बरा झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एका कॅनाडाच्या नागरिकाचा समावेश आहे. यो कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या शिवाय प्रमुख आणि छोट्या बंदरांवर एकूण 25 हजार 504 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लँडपोर्टवर 14 लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
सामुहिक देखरेखीअंतर्गत 42 हजार 296 प्रवाशांची तपासणी -
भारत सरकारने सामुहिक देखरेखीअंतर्गत जवळपास 42,296 प्रवाशांची तपासणी केली आहे. यातील 2,559 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर 522 लोकांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या शिवाय देशातील 30 विमानतळांवर एकूण 10 हजार 876 उड्डानांमध्ये 11 लाख 71 हजार 061 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 3,062 प्रवाशांसह 583 संपर्कात आलेल्या लोकांची ओळख करून त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.
चार डॉक्टरांचे एक पथ रोमला रवाणा
कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग झालेल्या चीन, इरान आणि जपानसारख्या देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठीदेखील सरकार प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून इराणमधून 1 हजार 199 जणांचे नमूने कोरोना चाचणीसाठी भारतात आणण्यात आले आहेत. या शिवाय आरोग्य मंत्रालयाने चार डॉक्टरांचे एक पथकही रोमला पाठवले आहे. त्यांना तेथे चाचणीसाठी भारतीयांचे नमुने गोळा करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानंतर तेथील भारतीयांना परत आणले जाणार आहे.
याशिवाय राज्यात नागपूर येथे तीन आणि पुणे, नगर आणि मुंबईत प्रत्येकी एक मिळून आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २० झाली आहे.