घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:39 AM2024-02-14T10:39:50+5:302024-02-14T10:40:34+5:30
जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पाटणा - बिहारच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप पाहिला मिळाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदसोबतची युती तोडून पुन्हा भाजपासोबत घरोबा केला. त्यानंतर, पुन्हा एकदा भाजपा-जयदू युतीचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, बहुमत चाचणीही सिद्ध करुन सरकार स्थीर असल्याचं दाखवून दिलं. मात्र, यावेळी, आमदारांची फोडाफोडी करत खेरदी झाल्याचा आरोप नितीश कुमार यांच्यावर विरोधकांकडून होत आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पक्षातील सहकारी आमदार संजीव कुमार यांनी भाजपाच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करण्याची विचारणा केली होती. तसेच, मला मोठी रक्कम देण्याची आणि कॅबिनेटमध्ये संधी देण्याचंही आमिष दाखवलं होतं, असे सुधांशू शेखर यांनी म्हटलं आहे.
बहुमत चाचणी सिद्ध करण्यापूर्वी सत्ताधारी जदयू पक्षाकडून आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे पक्षातूनच हा कट रचण्यात येत होता. याप्रकरणी, मंगळवारी जदयू आमदार सुधांशू शेखर यांनी पाटणा येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये, मला बहुमत चाचणीपूर्वी राजदच्या महाआघाडीत जाण्यासाठी १० कोटी रुपये लाच आणि कॅबिनेट मंत्रीपदाचे आमिष दाखवण्यात आले होते, असे म्हटले आहे. सुधांशू शेखर हे मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी मतदारसंघातून जदयूचे आमदार आहेत.
पाटणाचे पोलीस अधीक्षक कृष्ण मुरारी प्रसाद यांनी याबाबत म्हटले की, सुधांशू शेखर यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार संजीव कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ११ फेब्रुवारी रोजी शेखर यांनी ही फिर्याद दिली आहे. याप्रकरणी, भादंविनुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरू केल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं.
राजदचे तीन आमदार फुटले, अशी ही पळवापळवी
बिहारमधील नितीश सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. राजदच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिल्याने ठरावाच्या बाजूने १२९, तर विरोधात शून्य मते पडली. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान, यावेळी राजदने जदयूचे ५ व भाजपचे ३ आमदार गळाला लावले. १२२ मतांचा आकडा गाठणे भाजप-जदयूसाठी कठीण होते. प्रभारी विनोद तावडे यांनी सूत्रे हाती घेतली. जयदूचे ३ आमदार परत आणले व राजदच्या ३ आमदारांनाही गोटात आणले. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटविण्याच्या वेळी सरकारच्या बाजूने १२५ मतेच पडली होती.