१० कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात दररोज लाखो लोक, द. आफ्रिकेतूनही हजारो भाविक येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:05 IST2025-01-24T07:05:20+5:302025-01-24T07:05:31+5:30
Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या गुरुवारी १० कोटींहून अधिक झाली आहे. या संगमावर दररोज लाखो लोक येत आहेत.

१० कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात दररोज लाखो लोक, द. आफ्रिकेतूनही हजारो भाविक येण्याची शक्यता
प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या गुरुवारी १० कोटींहून अधिक झाली आहे. या संगमावर दररोज लाखो लोक येत आहेत. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात ४५ कोटींपेक्षा अधिक लोक येतील, हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाकुंभला दक्षिण आफ्रिकेतील हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे जोहान्सबर्गमधील भारताचे दूतावास महेश कुमार यांनी सांगितले.
महाकुंभ मेळ्याचा गुरुवारी ११वा दिवस होता. या दिवशी सकाळी ११:०० वाजेपर्यंत २३ लाखांहून अधिक भाविक स्नानासाठी आले होते. १३ जानेवारीपासून या मेळ्याला प्रारंभ झाला असून, त्यात विविध आखाड्यांच्या साधू - संतांसह देश - विदेशातून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. गुरुवारी सकाळी दिगंबर अनी आखाड्यामध्ये साधू-संतांनी काही गोष्टी सादर केल्या. त्यांनी ढोल - नगाऱ्यांच्या तालावर नृत्य केले. आपल्याकडे असलेल्या पारंपरिक शस्त्रास्त्रांचे त्यांनी प्रदर्शन केले. जम्मू - काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पवित्र स्नान केले. (वृत्तसंस्था)
महाकुंभातील अपुऱ्या व्यवस्थेसाठी भाजप जबाबदार - काँग्रेसची टीका
महाकुंभ मेळ्याचे नेटकेपणाने आयोजन करण्यात आलेले नाही. तिथे आलेल्या साधुसंत, जनतेला अपुऱ्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत अशी टिका काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय व खासदार उज्ज्वल रमण सिंह यांनी आरोप केला की, महाकुंभात सामान्य माणसांऐवजी व्हीआयपींवर भाजप सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, महाकुंभात एकता मिळते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले.
दिव्यांगांना मोफत उपचार
महाकुंभात वैद्यकीय केंद्रांमध्ये स्वत:ची तपासणीही करून घेत असून, त्यांना मोफत उपचार देण्यात येतात.
जयपूरस्थित एका संस्थेने दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले आहेत.
२७ जानेवारी हा दिवस धर्म स्वातंत्र्य दिन : ठाकूर
प्रसिद्ध प्रवचनकार देवकीनंदन ठाकुर यांनी सांगितले की, २७ जानेवारी हा दिवस धर्म स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार असून या दिवशी सनातन मंडळाच्या घटनेचा मसुदा धर्म संसदेत मांडला जाणार आहे.
येथील निरंजनी आखाड्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवकीनंदन ठाकूर म्हणाले की, आम्हाला सनातन मंडळाची गरज आहे. सनातन मंडळा घेतल्याशिवाय आम्ही कुंभ सोडणार नाही.
अभिनेत्री भाग्यश्रीने केले महाकुंभात पवित्र स्नान
अभिनेत्री भाग्यश्री यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले. त्यांनी सांगितले की, मी कुटुंबीयांसमवेत इथे आले आहे.
महाकुंभ मेळ्यात निवासाची उत्तम सोय केली आहे. प्रसाधनगृहे व अन्य मूलभूत सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. महाकुंभात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी पवित्र स्नान केले आहे.