१० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त जि.प.चे स्वच्छता अभियान : परिश्रम घेणारे पदाधिकारी, ग्रामस्थांचा सत्कार
By Admin | Published: October 13, 2015 08:50 PM2015-10-13T20:50:23+5:302015-10-13T21:07:08+5:30
जळगाव- हगणदरीमुक्त ग्रापंचायत संकल्पनेतून जिल्हाभरातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाची जोड आणि पंतप्रधानांचे स्वच्छतेचे आवाहन यास प्रतिसाद देत या कार्यक्रमास गती मिळाली आहे.
जळगाव- हगणदरीमुक्त ग्रापंचायत संकल्पनेतून जिल्हाभरातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाची जोड आणि पंतप्रधानांचे स्वच्छतेचे आवाहन यास प्रतिसाद देत या कार्यक्रमास गती मिळाली आहे.
जिल्हाभरात २ ऑक्टोबरपासून स्वच्छतेसंबंधीचा कार्यक्रम राबवित येत आहे. निर्मलग्राम योजनेचे नाव बदलण्यात आले असून, स्वच्छ भारत मिशन हाती घेण्यात आले आहे. त्यातच हगणदरीमुक्त ग्रामपंचायत ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
ज्या गावात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शौचालये आहेत अशा गावांमध्ये १०० टक्के शौचालये तयार करून हगणदरीमुक्त गाव संकल्पनेला आकार दिला जात आह.
पूर्वी प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय निर्मिती करून निर्मल ग्राम संकल्पना राबविण्यात येत होती. २०१३ मध्ये निर्मलग्राम योजनेऐवजी स्वच्छ भारत मिशन हाती घेण्यात आले. त्यात मागील वर्षी हगणदरीमुक्त ग्रामपंचायत ही संकल्पना हाती घेण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी दिली.
जिल्हाभरात हगणदरीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत २०१५-१६ मध्ये अमळनेर तालुक्यातील आमोदे व सुंदरपी, भुसावळमधील शिंदी, चाळीसगाव तालुक्यातील डामरून, खरजई व राहिपुरी, चोपडा तालुक्यातील करजाने, एरंडोलमधील आनंदनगर, यावल तालुक्यातील नावरे आणि मुक्ताईनगर तालुक्यातील वायले ही गावे हगणदरीमुक्त झाली आहेत.
महात्मा गांधींना वंदन करून अभियान
हगणदरीमुक्त गावांमध्ये २ ऑक्टोबरपासून विविध उत्सव, कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यात २ रोजी संबंधित गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. त्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गावात अधिकार्यांच्याहस्ते हगदणरीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेसाठी योगदान देणार्या काही ग्रामस्थांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
जिल्हाभरात ११५१ ग्रा.पं. आहेत. पैकी १२० ग्रा.पं. निर्मलग्राम योजनेत यशस्वी झाल्या आहेत. आता हगणदरीमुक्त गाव संकल्पनेत जे गाव कमी वेळेत हगणदरीमुक्त करणे शक्य आहे त्या गावावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात संबंधित गावांमध्ये २५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गटविकास अधिकारी व इतर अधिकारी आवर्जून त्या कार्यक्रमास प्रातिनिधीक स्वरुपात निवडलेल्या गावात उपस्थित होते.
हगणदरीमुक्त गावांची तालुकानिहाय संख्या- अमळनेर- २, भुसावळ- १, चाळीसगाव- ३, चोपडा- १, एरंडोल- १, यावल- १, मुक्ताईनगर १.