गहू, तूरडाळीवर १0% आयात शुल्क
By admin | Published: March 29, 2017 01:10 AM2017-03-29T01:10:58+5:302017-03-29T01:10:58+5:30
गहू आणि तूरडाळीच्या आयातीवर १0 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज जाहीर केला. हे शुल्क तत्काळ
नवी दिल्ली : गहू आणि तूरडाळीच्या आयातीवर १0 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज जाहीर केला. हे शुल्क तत्काळ लागू होणार आहे. यंदा विक्रमी उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत हा निर्णय जाहीर केला. गेल्याच आठवड्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी असा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेईल, असे सांगितले होते.
गेल्या ८ डिसेंबर रोजी गव्हाच्या आयातीवरील शुल्क १0 टक्क्यांनी कमी करून शून्य टक्के केले होते. देशांतर्गत उपलब्धता वाढण्यासाठी तसेच किरकोळ किमतींना लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. तूरडाळीवर कोणतेही शुल्क नव्हते. अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, गहू आणि तूरडाळीवर १0 टक्के आयात शुल्क तत्काळ प्रभावाने लावता यावे, यासाठी १७ मार्च २0१२ रोजीच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्याच्या आयात पातळीवर ८४0 कोटींचा महसूल मिळेल. या निर्णयामुळे गहू आणि तूरडाळीच्या घसरणाऱ्या ठोक किमतीवर नियंत्रण आणण्यात मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात येथील गव्हाचे नवे पीक बाजारात येऊ लागले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
उत्पादन अधिक, दर घसरले
सरकारच्या दुसऱ्या अंदाजानुसार, २0१६-१७ या पीक वर्षात चांगल्या पावसामुळे गव्हाचे
उत्पादन ९.७ कोटी टन होण्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी ते ९.२३ कोटी
टन होते. त्याचप्रमाणे तूरडाळीचे उत्पादन ४२.३ लाख टन होण्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी ते २५.६ लाख टन होते. अधिक उत्पादनामुळे तूरडाळीचा ठोक भाव घसरला आहे. किमान आधारभूत किंमतही शेतकऱ्यांना मिळेनाशी झाली आहे.