जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 जवान शहीद
By admin | Published: January 26, 2017 05:29 PM2017-01-26T17:29:49+5:302017-01-26T23:09:44+5:30
काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 26 - काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिका-यांनी दिली आहे.
बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या या दोन विचित्र घटना घडल्या आहेत. बर्फाची कडा कोसळल्यानं अनेक जवान बर्फाखाली दबले गेले. लष्करानं शोधमोहीम राबवत आतापर्यंत एका अधिका-यासह सात जवानांना वाचवण्यात यश मिळवलं आहे. उर्वरित शहीद जवानांचे मृतदेह बर्फाच्या ढिगा-याखालून काढण्यात आले आहेत.
गुरेझ सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालत असतानाच जवानांच्या पथकावर काळाने घाला घातला. जवानांच्या बचावासाठी मदत कार्य राबवण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे हिमस्खलनाच्या घटना वारंवार घडत असून, हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी काल मध्य काश्मिरमधील गंदेरबाल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे झालेल्या हिमस्खलनात लष्करी अधिकारी शहीद झाला होता. तर गुरेझ सेक्टरमध्ये बुधवारी झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
#UPDATE: Death toll in avalanche that struck army camp in Gurez Sector of J&K on 25 Jan '17 rises to 10
— ANI (@ANI_news) 26 January 2017