१० लाख कोटींचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित: PM मोदी, ५ वर्षांत विकास वेग अनेक पटींनी वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 06:14 AM2024-03-12T06:14:50+5:302024-03-12T06:14:58+5:30

वर्षभरात आतापर्यंत १० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली. या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी माझ्याकडे वेळ कमी पडत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

10 lakh crore projects dedicated to the nation in just one year said pm narendra modi | १० लाख कोटींचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित: PM मोदी, ५ वर्षांत विकास वेग अनेक पटींनी वाढवणार

१० लाख कोटींचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित: PM मोदी, ५ वर्षांत विकास वेग अनेक पटींनी वाढवणार

गुरुग्राम (हरयाणा) : भारताला जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पुढील पाच वर्षांत पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग अनेक पटींनी वाढवला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे दिली. वर्षभरात आतापर्यंत १० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली. या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी माझ्याकडे वेळ कमी पडत आहे, असेही ते म्हणाले.

देशभरातील सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या ११४ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते एका सभेला संबोधित करत होते. प्रमुख राष्ट्रीय महामार्ग (एनएच) प्रकल्पांपैकी मोदींनी ऐतिहासिक द्वारका एक्स्प्रेस वेच्या हरयाणा विभागाचे उद्घाटन केले. यावेळी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

विरोधी पक्षांची झोप उडालेली आहे

देशात ज्या वेगाने विकासकामे सुरू आहेत, ते पाहता विरोधी पक्ष आणि त्यांच्या घमेंडखोर आघाडीची झोप उडाली आहे. काँग्रेस पक्ष अजूनही प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मकतेने पाहत आहे आणि हे विरोधी पक्षांचे आणि त्यांच्या ‘इंडिया’ आघाडीचे ते वैशिष्ट्य बनले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व काही मोठ्या वेगाने हवे आहे.  - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

महिला शक्तीच्या वृद्धीचा नवा अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक महिला केंद्रित योजनांचा उल्लेख करताना, जो समाज महिलांचे स्थान उंचावतो आणि त्यांच्यासाठी संधी निर्माण करतो तोच पुढे जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले. ते नवी दिल्लीतील ‘सशक्त नारी-विकसित भारत’ कार्यक्रमाला संबोधित करत होते. आमचा तिसरा कार्यकाळ महिला शक्तीच्या उदयाचा नवा अध्याय लिहिणार, असे सांगितले.

दक्षिणेतही सभा

लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ मार्च रोजी केरळमधील पलक्कड येथे जाणार आहेत. १७ मार्च रोजी मोदी भाजपचे उमेदवार आणि काँग्रेसचे दिग्गज ए.के. अँटोनी यांचे पुत्र अनिल के. अँटोनी यांना पाठिंबा देण्यासाठी पथनामथिट्टाला भेट देतील. १२ मार्च रोजी पंतप्रधान मोदी १२०० कोटी रुपयांच्या साबरमती आश्रम स्मारक प्रकल्पाच्या आराखड्याचे अनावरण करणार आहेत.


 

Web Title: 10 lakh crore projects dedicated to the nation in just one year said pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.