४५ पैशांत प्रवाशांना १० लाखांचा विमा! 'आयआरसीटीसी'कडून धोरणात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 10:30 AM2024-11-06T10:30:30+5:302024-11-06T10:31:11+5:30
Indian Railway News: भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.
नवी दिल्ली - भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. हा विमा ऐच्छिक आहे. मात्र, एकदा खरेदी केल्यावर एका पीएनआरवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो अनिवार्य होईल. ही योजना केवळ भारतीयांसाठी आहे. ई-तिकिटांच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. प्रतिप्रवासी ४५ पैसे त्यासाठी अदा करावे लागतील.
विदेशी नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही. एजंट वा अन्य संस्थांच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यासही हा लाभ मिळणार नाही. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५ वर्षांखालील मुलांना योजनेबाहेर ठेवले आहे. मात्र ५ ते ११ या वयोगटातील मुलांना तिकिटासह अथवा विनाआसन बुकिंग केल्यानंतर विमा मिळू शकेल.
कशासाठी किती पैसे?
मृतदेह स्थलांतर : रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मृतदेह स्थलांतरित करण्यासाठी १० हजार रुपये मिळतील.
■ उपचार खर्च: रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी २ लाख रुपये मिळतील.
• कायमस्वरूपी / आंशिक अपंगत्व : रेल्वे अपघातात कायमस्वरूपी आंशिक अंपगत्व आल्यास विम्याची २०० टक्के रक्कम म्हणजेच १० लाख रुपये मिळतील,
• मृत्यू: रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवासाच्या वारशाला विम्याची सर्व १० लाख रुपयांची रक्कम मिळेल,