नव्या वर्षात मिळणार १0 लाख नोकऱ्या
By admin | Published: January 1, 2015 11:56 PM2015-01-01T23:56:28+5:302015-01-01T23:56:28+5:30
२0१५ हे वर्ष नोकरदारांसाठी नव्या आशा घेऊन येण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार नव्या वर्षात १0 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील
नवी दिल्ली : २0१५ हे वर्ष नोकरदारांसाठी नव्या आशा घेऊन येण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार नव्या वर्षात १0 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील तसेच उत्तम दर्जाचे काम करणाऱ्या नोकरदारांना ४0 टक्के पगारवाढ मिळेल.
सरासरी पगारवाढही १५ ते २0 टक्क्यांपर्यंत राहील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी ती १0 ते १२ टक्के होती. नव्या युगातील ई-कॉमर्सच्या क्षेत्रात अधिक पगारवाढ मिळण्याचा अंदाज आहे.
यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर ५.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. अलीकडच्या काळात तो ५ टक्क्यांपेक्षा कमीच होता. यंदा प्रथमच तो ५ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ रोजगार क्षेत्राला होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
नव्या वर्षात विदेशातील मोठ्या कंपन्या भारतात दुकाने काढण्यासाठी येतील. त्यातून रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील, असा अंदाज आहे. नव्या नोकऱ्यांच्या संधी नेतृत्वाच्या पातळीपासून कनिष्ठ पातळीपर्यंत सर्वच ठिकाणी असतील, असे जाणकारांचे मत आहे. सरासरी पगारवाढ २0 टक्के ते ४0 टक्के यादरम्यान राहील, असेही जाणकारांना वाटते.
माय हायरिंग क्लब या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, आयटी, एफएमसीजी आणि इतर प्रमुख क्षेत्रांत सुमारे ९.५ लाख नवे रोजगार निर्माण होतील. रोजगार क्षेत्राकडून मिळणारे संकेत २0१५ या वर्षाकडून अत्यंत उत्साहवर्धक आहेत.
विशेषत: ई-कॉमर्स, बँकिंग, वित्तीय क्षेत्र, आयटी, आयटीईएस आणि रिटेल या क्षेत्राकडून अधिक चांगले संकेत आहेत. या सर्वच क्षेत्रांत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक चांगल्या संधी आणि अधिक चांगले वेतन अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
हे ग्रुप या संस्थेचे संचालक आयोन हेवीट यांनी सांगितले की, भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना १0 ते १८ टक्के वेतनवाढ देतील, असे दिसते.
आशियात व्हिएतनामनंतर ही सर्वाधिक वेतनवाढ असणार आहे.
अॅब्सोल्यूट डाटा अनॅलॅटिक्स या संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष सुदेष्णा दत्ता यांनी सांगितले की, नव्या वर्षात बोनस वगैरे सोयी-सवलतीच्या माध्यमातून घसघशीत लाभ मिळेल.
अस्पायरिंग माइंडस या संशोधन संस्थेचे सीईओ हिमांशू अग्रवाल यांनी सांगितले की, उच्च दर्जाची कौशल्ये असणाऱ्या नोकरदारांना २0 टक्के ते ४0 टक्के पगारवाढ मिळेल, असे सध्याच्या स्थितीवरून दिसते.