ऑटो पार्ट्स उद्योगावर संक्रांत; 10 लाख नोकऱ्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 05:30 PM2019-07-25T17:30:45+5:302019-07-25T17:32:02+5:30

ऑटोमोबाईल उद्योगात मंदीसदृश्य वातावरण

10 lakhs jobs could be at stake due to slowdown in Auto parts industry | ऑटो पार्ट्स उद्योगावर संक्रांत; 10 लाख नोकऱ्या धोक्यात

ऑटो पार्ट्स उद्योगावर संक्रांत; 10 लाख नोकऱ्या धोक्यात

Next

नवी दिल्ली: ऑटोमोबाईल उद्योगात मंदीसदृश्य वातावरण असल्यानं त्याचा थेट परिणाम ऑटो पार्ट्स क्षेत्रावर पाहायला मिळत आहे. वाहनांची विक्री घटल्यानं ऑटो पार्ट्स क्षेत्रातील १० लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यामुळे सरकारनं ऑटो मोबाईल उद्योगावर लावलेल्या जीएसटीमध्ये बदल करुन दिलासा द्यावा, अशी मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं केली आहे. 

ऑटो पार्ट्स क्षेत्रात जवळपास ५० लाख कामगार काम करतात. जीएसटीमुळे गेल्या १० महिन्यांपासून वाहनांची विक्री घटली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचा भाग असणाऱ्या सर्व उद्योगांवर सारखाच जीएसटी लावण्याची मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून (एसीएमए) करण्यात येत आहे. 'जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री घटली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा प्रकारची समस्या याआधी कधीही उद्भवली नव्हती,' असं एसीएमएचे अध्यक्ष राम व्यंकटरमणी यांनी सांगितलं.  

'ऑटो मोबाईल उद्योग वाढल्यावर ऑटो पार्ट्स क्षेत्रालादेखील गती मिळते. मात्र सध्या वाहनांना मागणी नाही. वाहनांची विक्री १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. त्याचा थेट परिणाम ऑटो पार्ट्स क्षेत्रावर झाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १० लाख कामगारांचा रोजगार जाईल,' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ऑटो पार्ट्स क्षेत्रातील कंपन्यांनी कामगार कपात चालू केली का, या प्रश्नाला व्यंकटरमणी यांनी होकारार्थी उत्तर दिलं. या क्षेत्रातील ७० टक्के कर्मचारी कंत्राटांवर काम करतात. त्यामुळे मागणी कमी झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करावी लागते, असं त्यांनी सांगितलं. 
 

Web Title: 10 lakhs jobs could be at stake due to slowdown in Auto parts industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.