१० सिंह व १,६०० निलगायींचा बळी
By admin | Published: July 12, 2015 11:04 PM2015-07-12T23:04:25+5:302015-07-12T23:04:25+5:30
गुजरातच्या काही भागांत अलीकडे आलेल्या पुराने १० सिंह, १,६०० पेक्षा अधिक निलगायी आणि सुमारे ९० हरणांसह अनेक वन्य प्राण्यांचा बळी घेतला.
नवी दिल्ली : गुजरातच्या काही भागांत अलीकडे आलेल्या पुराने १० सिंह, १,६०० पेक्षा अधिक निलगायी आणि सुमारे ९० हरणांसह अनेक वन्य प्राण्यांचा बळी घेतला.
गुजरातच्या मुख्य वनसंरक्षकांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे दाखल केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. मुख्यत: अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांत सर्वाधिक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. याच दोन जिल्ह्यांत ८० पेक्षा अधिक सिंहांचा शोध घेण्यात वनाधिकारी यशस्वी ठरले. या भागांत ते ‘सुरक्षित’ फिरत असल्याचे वनाधिकाऱ्यांना आढळले. यंदा २ जुलैपर्यंत १० सिंह, १,६७० निलगायी, ८७ हरिण, ९ काळवीट, ६ जंगली डुकरांचे मृतावशेष सापडले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अमरेली जिल्ह्यात चार तर भावनगर जिल्ह्यात सहा सिंहांचा मृत्यू झाला आहे. कमी दाबाच्या पट्ट्याने गत २६ जूनला अमरेली जिल्ह्यातील धारी, बगसारा, कुकवाव तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला होता. केवळ सहा तासांत या ठिकाणी सुमारे २६ इंचांपर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे शेत्रुंजी नदीला पूर आला होता. या पुरात शेकडो वन्यजीवांना जीव गमवावा लागला होता. पशुचिकित्सकांकडून सिंहांच्या अवशेषांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते जाळण्यात आले.