दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:15 PM2023-12-07T13:15:56+5:302023-12-07T13:16:21+5:30

पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरे?

10 MPs resign including two Union Ministers; More ministers will resign | दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार

दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार

संजय शर्मा

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची नावे भाजपने निश्चित केली असून, या नावांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात झालेल्या चर्चेत या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेत या तीन राज्यांतील नव्या नेतृत्वाच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भोपाळ, रायपूर आणि जयपूर येथे होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या नावांची घोषणा केली जाणार आहे. 

आणखी मंत्री देणार राजीनामे

बाबा बालकनाथ आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह हे दोघेही दिल्लीबाहेर असल्याने राजीनामा देऊ शकले नाहीत; पण तेही राजीनामा देणार आहेत. रेणुका सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारमधील तीन केंद्रीय मंत्रीही कमी होणार आहेत. नरेंद्रसिंह तोमर हे कृषी मंत्रालय, प्रल्हादसिंह पटेल जलसंपदा आणि अन्न प्रक्रिया मंत्रालय पाहत होते, तर रेणुका सिंह आदिवासी विभागाचे काम पाहत होत्या

विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी?

येत्या एक-दोन दिवसांत या तीन राज्यांत केंद्रीय निरीक्षक पाठवले जातील. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्यांच्या नावाची घोषणा करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शनिवारी किंवा रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. 

नेमके कोणत्या खासदारांनी दिले राजीनामे? 

लोकसभेतील दहा खासदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केला. यामध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, खासदार राकेश सिंह, रीती पाठक, उदय प्रताप सिंह, गोमती साई, अरुण साव, राज्यवर्धनसिंह राठोड, दीया कुमारी, किरोडीलाल मीणा यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. जे.पी. नड्डा सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले. पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर सर्व खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले.

लालदुहोमांना उद्या शपथ
झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते लालदुहोमा शुक्रवारी मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. तत्पूर्वी, लालदुहोमा यांनी बुधवारी राज्यपाल हरिबाबू कंभामपती यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता राजभवनात ते शपथ घेतील. 

रेड्डी घेणार आज शपथ
 तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी गुरुवारी, ७ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हैदराबादच्या एलबी स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे. विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झाल्यानंतर रेड्डी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. 

Web Title: 10 MPs resign including two Union Ministers; More ministers will resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.