१० माजी लष्करप्रमुखांचे मोदींना खुले पत्र
By admin | Published: August 17, 2015 11:33 PM2015-08-17T23:33:54+5:302015-08-17T23:33:54+5:30
वन रँक वन पेन्शन योजना (ओआरओपी) लागू करण्यात राजकीय नेतृत्वाकडून निष्क्रियता दाखविली जात असल्याबद्दल १० माजी लष्करप्रमुखांनी पंतप्रधान
नवी दिल्ली : वन रँक वन पेन्शन योजना (ओआरओपी) लागू करण्यात राजकीय नेतृत्वाकडून निष्क्रियता दाखविली जात असल्याबद्दल १० माजी लष्करप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
या योजनेची अंमलबजावणी करण्यात आणखी विलंब लावल्यास सशस्त्र दलांचे नैतिक धैर्य खच्ची होईल. त्यामुळे विशिष्ट मुदत निर्धारित करून हा मुद्दा सोडविला जावा, अशी विनंतीही त्यांनी केली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जंतरमंतर येथे निदर्शने करणाऱ्या माजी सैनिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दिल्ली पोलिसांवर तडकाफडकी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आंदोलन आणखी तीव्र करताना दोन माजी सैनिकांनी आमरण उपोषण पत्करले असतानाच हे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यावर माजी लष्करप्रमुख व्ही.एन. शर्मा, शंकर रॉय चौधरी, एस. पद्मनाभन, एन.सी. विज, जे.जे.सिंग, दीपक कपूर आणि विक्रमसिंग यांच्या स्वाक्षरीचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा न केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)