देशातील १३ पैकी १० ब्रॅण्ड मध शुद्धता चाचणीत नापास; सीएसईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 04:19 AM2020-12-04T04:19:17+5:302020-12-04T08:02:47+5:30

१८ निकषांचे पालन करणे आवश्यक, बहुतेक ब्रॅण्डचे मध हे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेसोनान्स (एनएमआर) या शुद्धतेच्या चाचणीमध्ये नापास झाले. ही चाचणी जर्मनीतील एका प्रयोगशाळेत करण्यात आली.

10 out of 13 brands in the country fail honey purity test; CSE claims | देशातील १३ पैकी १० ब्रॅण्ड मध शुद्धता चाचणीत नापास; सीएसईचा दावा

देशातील १३ पैकी १० ब्रॅण्ड मध शुद्धता चाचणीत नापास; सीएसईचा दावा

Next

नवी दिल्ली : देशातील १३ महत्त्वाच्या ब्रॅण्डपैकी १० ब्रॅण्डचे मध शुद्ध नसल्याचे सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हॉयरमेन्ट (सीएस‌ई) या संस्थेने शुद्धतेबाबत केलेल्या चाचणीत आढळून आले आहे.

शुद्ध स्वरूपातील मधासाठी १८ निकष लावण्यात येतात व ते उत्पादक कंपन्यांनी पाळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न नियंत्रण कायद्यात तशी तरतूद आहे. सीएसईने १३ ब्रॅण्डचे साध्या स्वरूपातील व प्रक्रिया केलेला असे दोन्ही स्वरूपातील मध निवडून त्यांची शुद्धता चाचणी घेतली. या ब्रॅण्डमध्ये डाबर, पतंजली, बैद्यनाथ, झंडू आदी नामांकित कंपन्यांचा समावेश होता. 

बहुतेक ब्रॅण्डचे मध हे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेसोनान्स (एनएमआर) या शुद्धतेच्या चाचणीमध्ये नापास झाले. ही चाचणी जर्मनीतील एका प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामध्ये सफोला, मार्कफेड सोहना, नेचर्स नेक्टर या तीन ब्रॅण्डचेच मध शुद्धतेच्या निकषांनुसार योग्य असल्याचे दिसून आले. देशांतर्गत विक्रीसाठी नव्हे तर मध जेव्हा निर्यात केला जातो तेव्हा त्याची एनएमआर चाचणी केली जाते.

मधामध्ये साखरेच्या पाकाची भेसळ
विविध ब्रॅण्डच्या मधामध्ये साखरेचा पाक बेमालूमरीत्या मिसळलेला असतो, असे सीएसईच्या अन्नसुरक्षा विभागाचे अधिकारी अमित खुराणा यांनी सांगितले. काही कंपन्या चीनमधून सिन्थेटिक स्वरूपातील साखरेचा पाक आयात करून तो मधात मिसळतात, असा धक्कादायक आरोप सीएसईने केला आहे. आमच्या मधामध्ये साखरेचा पाक मिसळलेला नसतो, असा दावा डाबर या कंपनीने केला आहे.

Web Title: 10 out of 13 brands in the country fail honey purity test; CSE claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.