Corona Vaccination: “१ लाख द्या मगच लस घेतो”; मुख्यमंत्र्यांच्या गावात डोस घेण्यासाठी का घाबरतायेत गावकरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 01:22 PM2021-05-26T13:22:04+5:302021-05-26T13:26:09+5:30
गावातील लोकसंख्या १३५० इतकी आहे त्यात ४५ पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या ४२० पर्यंत आहे. यातील २७६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. शिवराज सिंह चौहान यांचं गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान(CM Shivraj Singh Chouhan) यांच्या गावात ४५ वर्षापेक्षा अधिक असलेल्या १० टक्के लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस(Corona Vaccination) घेण्यास नकार दिला आहे. काही लोक लसीचा डोस घेण्यापासून घाबरत आहेत तर काहींना स्लॉट बुक होत नाही. शिवराज सिंह चौहान यांचं गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे.
दै. भास्करच्या रिपोर्टनुसार, जैत गावात मागील दीड महिन्यात ६ जणांचा मृत्यू झाला. गावात झालेल्या मृत्यूनंतर कोरोनाचा सर्व्हे केला असता या गावात कोणीही सक्रीय रुग्ण नाही असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. तपासणीनंतर गावातील ५५ जणांना खोकला असल्याचं कळालं. गावातील लोकसंख्या १३५० इतकी आहे त्यात ४५ पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या ४२० पर्यंत आहे. यातील २७६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसऱ्या डोससाठी फक्त ३८ जण पुढे आले.
लसीकरणावरून लोकांमध्ये भय
गावातील लोकांशी बोलल्यानंतर सांगण्यात आलं की, याठिकाणी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना ताप आला. त्यामुळे दुसरा डोस घेण्याची भीती लोकांमध्ये आहे. तर काही जण म्हणतात ऑनलाईन बुकींगमध्ये स्लॉट उपलब्ध होत नसल्याने लस घेतली नाही. सैत गावचे सदस्य सत्य नारायण तिवारी म्हणाले की, गावातील ४ वृद्धांचा मृत्यू शहरात झाला आहे. परंतु ते नैसर्गिक मृत्यू आहेत. गावातील लोकांमध्ये लसीकरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.
आरोग्यसेविका सोनम सोनी म्हणाल्या की, जेव्हा गावात १७ मे रोजी लसीकरण सुरू होतं. तेव्हा केवळ ४ लोकांनीच लस घेतली. त्यामुळे उर्वरित लसीचे डोस खराब झाले. लसीकरण केल्यामुळे लोकांना ताप येत असल्याची दहशत लोकांच्या मनात आहे. त्यामुळे आम्ही लस घेणार नाही असं गावकरी सांगतात. तर काही जण १ लाख रुपये द्या तेव्हाच लस घेतो अशी अजब मागणीही करतायेत.
ना मास्क...ना जगजागृती
गावात प्रवेश घेताच मंदिराजवळील एका कठड्यावर दोन-ती गावकरी विनामास्क बसल्याचं दिसून आले. नर्मदा नदी किनारी तर काही जण नदीत आंघोळ करत होते. तर एकीकडे घराच्या बांधकामाचं काम सुरू होतं. त्यांनीही चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते.
गावकऱ्यांचा गैरसमज
पहिल्यांदा कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल व्हावं लागलं. ज्यांनी लस घेतली होती त्यांना ताप आला. ते आठवडाभर तापातच होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मग रुग्णालयात जाऊन गोळ्या औषधं घ्यायची की पोट भरायचं? त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेण्याची हिंमत होत नाही असं ७० वर्षीय फूलसिंह कोवट सांगतात.