केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण; सीआयएसएफ, आरपीएफसाठी तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:15 AM2024-07-12T06:15:37+5:302024-07-12T06:15:49+5:30
आरपीएफमध्ये काॅन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) या केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहेत. ही माहिती आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी गुरुवारी दिली.
त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आरपीएफमध्ये काॅन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. आरपीएफमध्ये माजी अग्निवीरांचा समावेश झाल्याने हे दल अधिक सुसज्ज व समर्थ होणार आहे.
सीआयएसएफ या केंद्रीय दलाच्या महासंचालक नीना सिंह यांनी सांगितले की, माजी अग्निवीरांसाठी सीआयएसएफमध्ये देखील १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. तसेच शारीरिक कार्यक्षमता चाचणीमध्ये काही सवलती दिल्या जातील. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी सांगितले की, बीएसएफच्या भरतीमध्येही माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे.