माजी अग्निवीरांना बीएसएफमध्ये १० टक्के आरक्षण, शारीरिक क्षमता चाचणी हाेणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:28 AM2023-03-11T06:28:48+5:302023-03-11T06:29:13+5:30
बीएसएफच्या भरती नियमांमध्येही करण्यात आले बदल.
नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) १० टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार बीएसएफच्या भरती नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत तसेच या भरतीसाठी माजी अग्निवीरांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही. ही माहिती केंद्रीय गृहखात्याने एका पत्रकात म्हटले आहे.
अग्निवीर सेवेत असताना पहिल्या किंवा त्यानंतरच्या कोणत्या तुकडीत कार्यरत होते याची माहिती घेण्यात येईल. त्यानुसार माजी अग्निवीरांना बीएसएफमध्ये भरती करताना त्यांच्या कमाल वयोमर्यादेची अट शिथील केली जाईल. यासंदर्भात केंद्रीय गृहखात्याने ६ मार्चला अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफमधील एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतील जवानांना बीएसएफमध्ये भरती होताना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळणार आहे.
अग्निपथ याेजनेचा झाला हाेता विराेध
अग्निपथ ही मोहीम सुरू केल्यानंतर त्यावर काँग्रेस, डावे पक्ष आदी विरोधकांनी टीका केली होती. अशा भरतीचे लष्करावर वाईट परिणाम होतील, असे विरोधी पक्षांनी म्हटले होते. या योजनेबद्दल विविध राज्यांत निदर्शनेही झाली होती. मात्र, केंद्र सरकारने या टीकेकडे दुर्लक्ष करून अग्निपथ योजना अमलात आणली.
भरती नियमांत केले बदल
माजी अग्निवीरांच्या भरतीबाबत नियमांत केलेले बदल ६ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही.