१0 जागांनी दिला भाजपाला दगा, कमी मतांनी पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:16 AM2018-05-17T05:16:23+5:302018-05-17T05:16:23+5:30
कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळतेल, अशी चिन्हे दिसत असताना त्या पक्षाचे किमान १0 उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले आणि पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, असे सर्व निकालांनंतर स्पष्ट झाले आहे.
बंगळुरु : कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळतेल, अशी चिन्हे दिसत असताना त्या पक्षाचे किमान १0 उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले आणि पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, असे सर्व निकालांनंतर स्पष्ट झाले आहे.
भाजपाचे १0 उमेदवार ३000 हजारांहून कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्या मतदारसंघांकडे अधिक लक्ष दिले असते, राज्य व राष्ट्रीय नेत्यांनी तिथे मदत केली असती, तर ते निवडून आले असते, असे तेथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या जागा निश्चित निवडून येतील, असा पक्षनेत्यांचा अंदाज होता आणि या अंदाजानेच भाजपाला दगा दिला.
रायचूर जिल्ह्यातील मास्की मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार अवघ्या २१३ मतांनी पराभूत झाले. तिथे काँग्रेसचा विजय झाला. तसेच अन्य सहा जागांवर २000 हून कमी मतांनी भाजपाच्या उमेदवारांना पराभव सहन करावा लागला. चिकमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी मतदारसंघात आपला विजय निश्चित आहे, असा भाजपाला विश्वास होता. तिथे भाजपाचे डी. एन. जीवराज यांना प्रत्यक्षात पराभवाला सामोरे जावे लागले. सीमा भागातील अथणी मतदारसंघातील लक्ष्मण सवदी यांच्या विजयाचीही भाजपाला खात्री होती. पण ते अतिशय कमी मतांनी पराभूत झाले. या जागांवर विजय मिळला असता, तर भाजपाच्या हाती सत्तेच्या किल्ल्या सहजच मिळाल्या असत्या.
>मते फुटल्याचा लाभ
चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या व जनता दल (ध) चे टी. जी. देवेगौडा यांच्यात मतांची फाटाफूट होईल आणि त्यात आपला उमेदवार विजयी होईल, असे भाजपा नेत्यांना वाटत होते.
तिथे सिद्धरामय्या पराभूत झाले. पण जनता दलाचे देवेगौडाच जिंकून आले.