हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार

By admin | Published: May 28, 2017 04:31 AM2017-05-28T04:31:49+5:302017-05-28T04:31:49+5:30

काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १0 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या

10 terrorists killed with Hizbul commander | हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार

हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार

Next

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १0 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वनीचा वारसदार सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला आहे. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला.
सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला आहे. किमान ५0 ठिकाणी दगडफेक सुरू झाली. हिंसाचारामुळे बऱ्याच भागांमध्ये बंदसदृष्य वातावरण असून, कुलगाम, पुलवामा आणि शोपियन या भागांत सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरल्याने, खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. वणी मारला गेल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात भडकलेल्या हिंसाचारात सुमारे १00 जण मरण पावले होते.
राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी सबजार व त्याच्या साथीदार असलेल्या एका इमारतीच्या परिसराला वेढा घातला. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. त्या दोघांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरू करताच, प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सबजार व त्याचा साथीदार ठार झाले, असे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

कोण आहे सबजार?
गेल्या वर्षी ८ जुलै रोजी लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान वनी ठार झाल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली. सब डॉन म्हणून तो काश्मीर खोऱ्यात ओळखला जायचा. वनीच्या मृत्युनंतर मेहमूद गझनवीला कमांडर केल्याचे हिजबुलने जाहीर केले होते, पण गझनवीविषयी कोणालाच माहिती नसून, सबजारचेच ‘गझनवी’ हे टोपण नाव असावे, असा अंदाज आहे. सबजारवर १० लाखांचे इनाम होते.
सबजार हा वनीचा विश्वासू साथीदार होता. वनीबरोबर त्याने दोन वर्षे काम केले होते. हिजबुलच्या संपूर्ण नेटवर्कची त्याला माहिती होती. सबजारचे एका मुलीवर प्रेम होते. तिच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर सबजार दहशतवादी कृत्यांकडे वळला.
बुरहान वनीचा मोठा भाऊ खालिद याची हत्या झाल्यानंतर, आंदोलन सुरू असताना सबजारने एका अधिकाऱ्याच्या हातून बंदूक हिसकावली होती. त्यानंतर, त्याला हिजबुलमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले होते.

दोन अतिरेकी ठार
पुलवामा जिल्ह्यातील
त्रालमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला करणारे दोन दहशतवादीही चकमकीमध्ये ठार झाले. साईमुह गावात लष्कराच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. हा हल्ला होताच, जवानांनी लगेचच येथील परिसराला घेराव घालून त्यांचा शोध सुरू केला. त्या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले.


मुंबई, दिल्लीत अ‍ॅलर्ट
पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचे दहशतवादी दिल्ली व मुंबईमध्ये किंवा पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. तोयबाचे २० ते २१ हस्तक भारतात असावेत. त्यामुळे रेल्वे स्थानके, विमानतळे, हॉटेल्स, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आदी गर्दीच्या ठिकाणची गस्ती वाढविण्यात आल्या आहेत. दहशतवादी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: 10 terrorists killed with Hizbul commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.